सोनसाखळी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यांपैकी दोघांना लोकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबई आणि परिसरात सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यात पाश्र्वभूमीवर दिंडोशी पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून सोनसाखळीच्या ११ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून ३ लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आली आहे. तर दहिसर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
दरम्यान, आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोनसाखळी चोरणाऱ्यांना नागरिकांनीच रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल़े नासिर इब्राहिम कोची आणि अब्दुल रेहमान हुसानी अशी या चोरांची नावे आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी सोनसाखळी चोरून ते पळत असताना रस्त्यावरील नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडले. मंगळवारी पोलिसांनी या नागरिकांचा सत्कार केला. तसेच दहिसर येथूनही एका सोनसाखळी चोराला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले सर्व आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांनी दिली.