मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) ‘ग्रोथ हब’ म्हणून विकास करण्यात येणार असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याचा अंतिम आराखडा तयार केला आहे.या आराखड्यानुसार येत्या काही वर्षांत एमएमआरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची सात व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. आर्थिक विकास केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे- कुर्ला संकुलासह कुर्ला- वरळी, विरार- बोईसर बुलेट ट्रेन स्थानक परिसर, गोरेगाव चित्रनगरी, खारघर आणि नवी मुंबई ऐरोसिटीचा त्यात समावेश आहे.

देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्राने देशातील चार महानगरांचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापार केंद्रे कोठे?

वांद्रे-कुर्ला संकूल : जी ब्लॉकमधील २० हेक्टर जागेचा विकास केला जाणार. येथे निवासी, व्यावसायिक संकुल, मॉलसह इतर सेवा विकसित केल्या जाणार.

कुर्ला- वरळी : कुर्ल्यातील १०.५ हेक्टर जागेचा निवासी संकुलासह हॉटेल, व्यावसायिक संकुल म्हणून विकास. वरळीतील ६.४ हेक्टर जागेचा कार्यालये, हॉटेल, रुग्णालय आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकास.

वडाळा : २० हेक्टर जागेचा विकास पूर्णत आर्थिक केंद्र म्हणून केला जाणार.

गोरेगाव : गोरेगाव चित्रनगरी परिसराचाही व्यापार केंद्रामध्ये समावेश. येथील ११० हेक्टर जागेचा विकास करून चित्रपटसृष्टीशी संबंधित उद्याोग-व्यवसायांना चालना.

नवी मुंबई : विमानतळालगत ऐरोसिटी विकसित केली जात आहे. त्यात २७० हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल, प्रदर्शन केंद्र, मरिना आणि मनोरंजन केंद्राचा विकास.

खारघर : १५० हेक्टर जागेवर व्यावसायिक, निवासीदृष्ट्या विकास करण्यासह येथे हॉटेल आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार.

विरार-बोईसर : बुलेट ट्रेन मार्गिकेवरील बोईसर आणि विरार या दोन बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास.

Story img Loader