मुंबई : कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बेस्ट बसने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले. यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये चार, शीव रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, हबीब रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुर्ला आणि आसपासच्या परिसरात शोकाकळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणाऱ्या बेस्ट बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात ४९ जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालय, शीव रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाभा रुग्णालयात ३८ जणांना उपचारासाठी आणण्यातआले होते. यापैकी ५ जणांना हबीब रुग्णालयात, ४ जणांना शीव रुग्णालयात, तसेच क्रिटीकेअर आणि सीटी रुग्णालयात प्रत्येकी १ रुग्णाला हलविण्यात आले. १६ जणांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. त्यामुळे सध्या भाभा रुग्णालयामध्ये सात जणांवर उपचार सुरू असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात दाखल बहुतांश रुग्णांना गंभीर दुखापत झाली असून, या सर्व रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे. सीटी स्कॅनचा अहवाल सामान्य आला असल्याची माहिती भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पद्मश्री अहिरे यांनी दिली. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कनीस अन्सारी (५५), आफ्रिन शाह (१९), अनाम शेख (२०) आणि शिवम कश्यप (१८) यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य

शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात जणांपैकी एकाच मृत्यू झाला. मोहम्मद इस्लाम मोहम्मद निझाम अन्सारी (४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आलम मेहता (२२) याच्या मेंदूत रक्तस्राव झाला असून, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जोरात मार लागल्यामुळे फजूल रेहमान याच्या छातीत रक्तस्राव झाला. त्याच्या कमरेचे हाड मोडले आहे. या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सूद्दू कुमार (१६) याच्या डोक्याला मार लागला असून, मस्तान शेख (२९) याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पंकज कुमार सिंग (३०) याच्या डाव्या डोळ्याला मार लागला आहे. मोहम्मद साजिद (२३) याच्या हाताला चार इंचाची जखमी झाली आहे, तसेच मोहम्मद इंजमाम उल हक (१९) याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

हेही वाचा >>> Best Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तातडीची मदत, बेस्ट उपक्रमाकडून चौकशी समिती स्थापन

सेव्हन हिल रुग्णालयामध्ये चार जणांना दाखल करण्यात आले असून, हे चारही पोलीस आहेत. भाभा रुग्णालयात दाखल झालेल्या ३८ जखमींपैकी काहींच्या नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भाभा रुग्णालयामध्ये त्यांची नोंद करून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आणि त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर काही रुग्णांना थेट खासगी रुग्णालयातच नेण्यात आले. त्यानुसार हबीब रुग्णालयात सहा, फाैजिया रुग्णालयात दोन, सीटी आणि कुर्ला नर्सिंग होममध्ये प्रत्येकी एका जखमीला दाखल करण्यात आले. तसेच कोहिनूर रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी एकाच मृत्यू झाला असून, दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven killed 43 injured in kurla bus accident mumbai print news zws