लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : घरात खेळत असताना सात महिन्यांच्या बाळाने एकाचवेळी तीन चाव्या गिळल्या. त्या चाव्या श्वास नलिकेत अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ त्याची प्रकृती बिघडली. मात्र राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून बाळाच्या श्वास नलिकेतून तिन्ही चाव्या बाहेर काढून बाळाचे प्राण वाचवले.

दोन आठवड्यांपूर्वी सात महिन्यांचा रेयान घरात खेळत असताना त्याला तेथे चाव्या पडलेल्या दिसल्या. त्या चाव्यांशी खेळताना त्याने त्या पटकन गिळल्या. रेयानने चाव्या गिळल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रेयानला शताब्दी रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र रेयानच्या कुटुंबियांनी त्याला राजावाडी रुग्णालयात आणले. राजावाडी रुग्णालयात रेयानला दाखल करण्यात आले त्यावेळी चाव्या त्याच्या श्वास नलिकेत अडकलेल्या असल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे कान-नाक-घसा विभागाच्या डॉ. देविका शेरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. देविका शेरे यांच्याबरोबरच भूल विभागाच्या प्रमुख डॉ. रिना नेबू व डॉ. सुप्रिया येमपल्ले या डॉक्टरांनी रेयानची तपासणी केली असता चाव्या त्याच्या घसा व श्वास नलिकेत अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आणखी वाचा-बड्या विकासकांची फौजदारी कारवाईतून सुटका? मोफा कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव

चावी व त्याला लावलेली रिंग रेयानाच्या टॉन्सिलजवळ अडकली होती. यामुळे स्वरयंत्राचे व तेथील धमन्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सावधगिरीने स्वरयंत्रातून दोन चाव्या आणि रिंग प्रथम काढली. त्यानंतर रेयानच्या पुढील तपासणीदरम्यान अनुनासिक पोकळीत आणखी एक चावी सापडली. नाकाच्या पोकळीत घसरलेली तिसरी चावीही अथक प्रयत्नाने काढण्यात आली. माझ्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत सात महिन्यांच्या मुलाच्या तोंडच्या पोकळीतून तीन चाव्या काढण्याची ही पहिली आणि दुर्मीळ घटना असल्याचे डॉ. देविका शेरे यांनी सांगितले.

रेयानला शस्त्रक्रियागृहात नेल्यानंतर तो मोठ्याने रडत होता. त्याच्या या रडण्याने त्याच्या घशातील वायूमार्ग बाधित झाला नसल्याचे लक्षात आले. चाव्या आकाराने मोठ्या असल्याने श्वसनलिका बंद झाली नाही. अन्यथा बाळ गुदमरले असते. आम्ही एक जीव वाचवू शकलो याबद्दल आनंद असल्याची भावना राजावाडी रुग्णालयातील भूलविभाागाच्या प्रमुख डॉ. रीना नेबू यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-जूनमध्ये मुंबईत साडेअकरा हजारांहून अधिक घरांची विक्री, मागील बारा वर्षातील जूनमधील सर्वाधिक गृहविक्री

राजावाडी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी तत्परतेने काम केले. रेयानला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. आमचे कुटुंब नेहमीच त्यांचे कृतज्ञ राहिल, असे रेयानचा काका मोहम्मद नसीम याने सांगितले.

शिवसेना उबाठाकडून डॉक्टरांचे कौतुक

शिवसेना उबाठाचे मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, विभागप्रमुख सुरेश पाटील, घाटकोपर पूर्व विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी चंद्रपाल चंदेलिया, प्रकाश वाणी, सचिन भांगे तसेच शिवसैनिकांनी रुग्णालयात भेट देऊन बाळाच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांचे कौतुक केले.