मुंबई : महाराष्ट्रासह देशामध्ये वाढणाऱ्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार लक्षात घेऊन राज्यातील निम्नवैद्यकीय अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यात सात नवी शासकीय परिचर्या महाविद्यालये सुरू करण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
संसर्गजन्य रुग्णांवर उपचार करण्यामध्ये निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे राज्यातील निम्नवैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्यात सात नवी परिचर्या महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या सात महाविद्यालयांसाठी १८७.८७ कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापैकी १७३.८८ कोटी रुपये निधी पहिल्या चार वर्षांमध्ये खर्च करण्यात येणार आहे. तर पाचव्या वर्षापासून दरवर्षी जवळपास १३ कोटी ९९ लाख इतका निधी या महाविद्यालांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा – विरार पोलिसांचे कोंबिग ऑपरेशन, अपहृत मुलीची पोलिसांनी केली सुटका
ही सर्व महाविद्यालये तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणार आहेत. यातील चार परिचर्या महाविद्यालयांचे बांधकाम, यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च यासाठी अंदाजे १०७ कोटी ९४ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच या महाविद्यालयांसाठी आवश्यक पदे भरण्यात येतील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.