घाटकोपर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला गेल्या रविवारी सात – आठ जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या घटनेदरम्यान कर्तव्यावर असलेल्या तीन रेल्वे पोलिसांना लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी गुरुवारी निलंबित केले.
घाटकोपरमधील पोलीस पेट्रोल पंपावर ६ नोव्हेंबर रोजी रात्री १.४० च्या सुमारास दोन जण पेट्रोल भरण्यास आले होते. पंपावर कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर पंपावरील कर्मचारी लोकेश अवल तेथे आला आणि उभयतांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. काही वेळाने सात ते आठ जण पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेची पंतनगर पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दोन हजार बेस्ट बस दाखल होणार
लोकेश आणि अन्य तेथील कामगारांना मारहाण केल्याप्रकरणी मंगेश कांबळे, मनजीत सिंग सोटे, स्वप्निल शिंदे, ओमकार दामले,कडकसिंग भिसे, राहुल भटालिया आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केल्याप्रकरणी पोलीस पेट्रोल पंपावर कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कर्तव्यावर असलेल्या तीन रेल्वे पोलिसांना लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. रेल्वे पोलीस कर्तव्यावर असताना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण झाली. कर्तव्यात बेशिस्त, बेजबाबदार व हलगर्जीपणा करण्यात आल्याने लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सहाय्यक पोलीस फौजदार सुधीर मोरे, हवालदार गोरखनाथ मोहिते, हवालदार गणेश बागल यांना निलंबित केले.