मुंबई : सराफाचे सोने घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करून लुटण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोत्याने हल्ला करणाऱ्या सात जणांना माटुंगा पोलिसांनी अटक केली. आरोपींपैकी एक जण यापूर्वी अंगडिया कंपनीत कामाला होता. त्यामुळे सोन्याची ने-आण करणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत त्याला माहिती होती. त्यातून आरोपींनी दरोड्याचा कट रचला होता. पण पोलिसांनी तात्काळ तिघांना घटनास्थळावरून अटक केली व उर्वरीत चौघांचा शोध घेऊन त्यांना साताऱ्यातून अटक केली.

गौरव राजेंद्र ढमाल (२३), ओमकार संपत घोलप (२३), तेजस कृष्णाजी जाधव (२४), सुनील गाडेकर, साहील शेंंडगे, रणजीत कुडाळकर व साहील खडसरे अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी पुण्यातील शिरवळ येथे राहणारे आहेत. एका सराफाचे सोने घेऊन अंगडियाचा कर्मचारी रत्नागिरीवरून येत असल्याची माहिती या टोळीला मिळाली होती. व्यापारी मुंबई बसने येत होता. आरोपींनी एक मोटरगाडी व दोन दुचाकींने या बसचा पाठलाग केला. आरोपींचा एक साथीदार अंगडियाच्या कर्मचाऱ्यासोबत बसमध्ये होता. तो अंगडियाच्या कर्मचाऱ्यांबद्दल इतर साथीदारांना माहिती देत होता. ही बस गुरुवारी पहाटे दादर टीटी येथे पोहोचली. अंगडिया कर्मचारी विजय निंबाळकर बसमधून उतरला व जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पीत उभा असताना कोयता टोळीचे चौघे तेथे आले व त्यांनी निंबाळकरवर कोत्याने हल्ला केला. तर दुसऱ्याने त्याच्या हातातील चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरडाओरड होताच जवळच असलेल्या माटुंगा पोलीस चौकीतील पोलीस घटनास्थळी धावत आले आणि नागरिकांच्या मदतीने मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांपैकी तिघांना पकडण्यात यश आले. एक जण पळून गेला. पोलिसांनी निंबाळकरला उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींची चौकशी केली. त्याच्या चौकशीत इतर चार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हवालदार नथुराम चव्हाण, शिपाई अनिल उंडे व महेंद्र तांबे यांच्या पथकाने चार आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी सातारा येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली.

हेही वाचा >>>ईडीकडून मुंबई आणि जौनपूरमध्ये मालमत्ता जप्त; ४.१९ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त

आरोपींपैकी गाडेकर हा पूर्वी अंगडिया कंपनीत कामाला होता. त्याच्या मदतीने इतर आरोपींनी दरोड्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी दोन वेळा रेकीही केली होती. आरोपींपैकी एक आरोपी शिक्षण घेत असून दोघे जण खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. या टोळीकडून दोन महागड्या मोटारसायकल आणि कोयता जप्त करण्यात आला.

सोन्याऐवजी होती चांदी

अंगडिया कंपनीचा कर्मचारी निंबाळकर हा मोठ्या प्रमाणात सोने अथवा रोख रक्कम घेऊन निघाला असल्याचे आरोपींना वाटले. पण प्रत्यक्षात त्याच्याकडे चांदी होती. त्याची किंमत दीड लाख रुपये होती. पण ती लुटण्याआधीच आरोपींना अटक झाली.