येत्या काही वर्षात पश्चिम रेल्वेवरील सात स्थानकांचाही ‘अमृत भारत स्थानक योजने’तर्गत विकास करण्यात येणार आहे. या स्थानकांवर रुफ प्लाझा, नवीन प्रसाधनगृहांसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
हेही वाचा- मुंबई : मानखुर्दमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या, ४ आरोपींना अटक, शौचालयात आढळला होता मृतदेह
रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत मध्य रेल्वेवरील १५ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्थानकांचा विकास करण्यासाठी अनुभवी वास्तूविशारद संस्थाकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील सुरत, उधनापर्यंत १४ स्थानके आहेत. विकास योजनेअंतर्गत यापैकी उपनगरीय मार्गावरील सात स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅन्ट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, मालाड, जोगेश्वरी या स्थानकांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वे यासाठी वास्तूविशारद आणि तांत्रिक सल्ल्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.
सात स्थानकांमध्ये रुफ प्लाझा सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्यात स्टॉल, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आदी सुविधांचा समावेश असणार आहे. तसेच विकास करताना स्थानकांतील प्रवेशद्वारांची लांबी-रुंदी वाढवणे, स्थानकाच्या दर्शनी भाग, रेल्वेच्या हद्दीतील वर्दळीचा परिसर, फलाटावरील छत, ड्रेनेज, तसेच फलाटाच्या पृष्ठभागाची सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन प्रसाधनगृह, स्थानकात अन्य प्रवेशद्वारांसाठी नियोजन, फलाटावर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.