लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मंडईतील गाळ्यांच्या भाड्यात तब्बल सातपट वाढ करण्यात आली आहे. गाळ्यांचे भाडे २०० रुपयांवरून थेट १३०० ते १४०० रुपये करण्यात आले आहे. ही भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी मंडईतील गाळेधारकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या मंडयांमध्ये वर्षानुवर्षे गाळेधारक आपला व्ययसाय करीत आहेत. गेली अनेक वर्षे या गाळ्यांसाठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. मात्र अचानक या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासकीय राजवटीत घेण्यात आला. लालबाग येथील मुंबई महानगरपालिकेच्या सी. जे. शहा मंडईमधील गाळेधारकांनी या भाडेवाढीविरोधात तक्रार केली आहे. ही भाडेवाढ रद्द करावी या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी प्रशासनाला दिले आहे. स्थानिक आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात महानगरपालिका सह आयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. यावेळी लालबाग मार्केटमधील गाळेधारक उपस्थित होते.

आणखी वाचा- मुंबईः स्वाक्षरी व हातावर गोंदवलेल्या बदाम, क्रॉसच्या आधारे १५ वर्षे फरार आरोपीला अटक

१९९५ पासून मंडईतील गाळ्यांचे भाडे २०० रुपये होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने १ सप्टेंबर २०२२ पासून अचानक गाळ्यांच्या भाड्यात वाढ केली. तसेच दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकीळ यांनी दिली. ही भाडेवाढ अन्यायकारक असून ‘क’ वर्गातील व्यावसायिकांचे भाडे थेट १३०० ते १४०० म्हणजेच सातपट करण्यात आल्याचे कोकीळ यांनी सांगितले.

करोना व ताळेबंदीनंतर उद्भवलेली आर्थिक परिस्थिती, ऑनलाईन विक्री तसेच मॉलसंस्कृती यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे, त्यामुळे ही भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही भाडेवाढ रद्द झाल्यास संपूर्ण मुंबईमधील मंडईतील गाळेधारकांना दिलासा मिळेल.त्याचा लाभ मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven times increase in rent of vegetables in bhaji mandi mumbai print news mrj