रुग्णालयातील नोकरीऐवजी कुकुटपालन व्यवसायात सफाई कामगारपदी नियुक्ती
मुंबईः सौदी अरेबियामधील रुग्णालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दक्षिण मुंबईतील सात तरूणांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद अबुतालीब सय्यद याच्याविरुद्ध सर जे.जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने प्रत्यक्षात या तरुणांना तेथील कुकुटपालन व्यवसायात सफाई कामगार म्हणून काम करण्यास भाग पाडले, तर उर्वरित दोघांचे पारपत्र जमा करून त्यांना परदेशात पाठवलेच नाही. या संपूर्ण प्रकारात पावणेनऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. आरोपीने अशा प्रकार आणखी काही तरूणांची फसवणूक केल्याचा संशय असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
फसवणुकीचा प्रकार
चिंच बंदर परिसरात वास्तव्यास असलेला ४१ वर्षीय चालक मोहम्मद सय्यदुर रहमान मोहम्मद अब्दुल हमीद यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये मोहम्मद अबुतालीब याच्याशी ओळख झाली. आरोपीने त्यांना परदेशात उत्तम नोकरीच्या संधीचे आमिष दाखवले आणि सौदी अरेबियातील एका प्रसिद्ध रुग्णालयात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याने केलेल्या दाव्यांना बळी पडलेल्या हमीद यांनी, तसेच त्यांचे दोन भाऊ आणि पाच नातेवाईकांनी नोकरीसाठी अर्ज केला. या सर्वांनी नोकरी व व्हिसा प्रक्रियेसाठी आरोपीकडे आठ लाख ७५ हजार रुपये दिले.
कुकूटपालन व्यवसायात सफाई कामगार
सर्व प्रकिया पूर्ण झाल्यानंतर पाच जणांना परदेशात पाठवण्यात आले. प्रसिद्ध रुग्णालयात नोकरी मिळण्याच्या आशेने सर्वजण आनंदी होते. मोहम्मद सारिम अहमद, रशीद अहमद, मोहम्मद इस्माईल अली, मोहम्मद जमालुद्दीन आणि मोहम्मद बद्रुद्दीन फारूक अहमद यांना सौदी अरेबियाच्या रियाध शहरात पाठवण्यात आले. पण सौदीमध्ये गेलेल्या पाचही जणांना तेथील पोल्ट्रीफार्मवर सफाई कर्मचारी म्हणून नोकरी देण्यात आली.
आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण पर्याय नसल्यामुळे त्यांनी तेथे नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिथे एक महिना काम केले आणि नंतर त्यांना परत भारतात पाठवण्यात आले. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी सय्यदुर यांना या फसवणुकीबाबत माहिती दिली. दरम्यान, सय्यदुर यांचे दोन भाऊ – रियाझुल अहमद आणि कमरूल अहमद यांना सौदी अरेबियाला पाठवण्यात आलेच नाही, शिवाय त्यांचे पारपत्र आरोपी अबुतालीबने ताब्यात घेतले व त्यांना परत केलेच नाही. हे समजल्यानंतर सय्यदुर यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिस कारवाई
याप्रकरणी दाखल तक्रारीची पोलिसांनी पडताळणी केली. प्राथमिक तपासणीत तथ्य आढळल्यामुळे सर जे.जे. मार्ग पोलिसांनी मोहम्मद अबुतालीब सय्यदविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.