मुंबई : ठाणे जिल्हा रुग्णालयात रविवारी १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी सातवाजेपर्यंत एकाच दिवसात तब्बल ७२ लहान मुलांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातील शहापूर,वाडा,जव्हारपासून दुर्गम भागातील आदिवासी तसेच गोरगरीब मुलांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.निमित्त होते विख्यात बालशल्यचिकित्सक डॉ संजय ओक यांच्या वाढदिवसाचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरतर गेले अनेक दिवस या शस्त्रक्रियांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार तसेच अन्य डॉक्टर तयारी करत होते. गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या जेवणापासून ते शस्त्रक्रियेची सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. रविवारी सकाळपासून डॉ संजय ओक तसेच पालिकेच्या शिव रुग्णालयातील त्यांचे सहकारी डॉक्टर आणि ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह आवश्यक कर्मचारीवर्ग शस्त्रक्रिया करत होते. सायंकाळी सातवाजेपर्यंत या ७२ बालकांवरील शस्रक्रिया पूर्ण झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले.

हेही वाचा…दीड कोटी बालकांना आरोग्य विभाग देणार जंतनाशक गोळी!राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमीत्त…

यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून ठाणे जिल्हा रुग्णालयात बालकांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात येत असल्याचे डॉ संकेत कुलकर्णी यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मुरबाड,शहापूर,जव्हार,ठाणे तसेच नवी मुंबईतून या बालकांची निवड करण्यात आल्याचे डॉ कुलकर्णी म्हणाले.

केईएमचे अधिष्ठाता व पालिकेच्या सर्व रुग्णालयांचे संचालक म्हणून १३ वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डॉ. ओक हे वर्षाकाठी शासनाच्या विविध ग्रामीण रुग्णालयात तसेच इमेरीटस प्रोफेसर म्हणून पालिकेच्या शीव रुग्णालयात जाऊन सुमारे एक हजार बालकांच्या शस्त्रक्रिया करतात. यासाठी ते फुटकी कवडीची कोणाकडून घेत नाहीत. केईएमचे अधिष्ठाता व महापालिका रुग्णालयांचे संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर डी.वाय.पाटील संस्थेत कुलगुरू म्हणून डॉ ओक यांनी काम पाहिले. तसेच प्रिन्स अलिखान हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. करोनाच्या काळात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ‘कोविड टास्क फोर्स’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य अमूल्य म्हणावे लागेल. सध्या ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत असून केईएममधून निवृत्त झाल्यानंतर एकाही रविवारी सुट्टी न घेता डॉ संजय ओक हे आदिवासी भागातील तसेच गोरगरीब लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करतात.

आरोग्य विभागाच्या उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी येऊन स्वेच्छेने रुग्णसेवा करावी, असे आरोग्य विभागाचे धोरण आहे. तथापि फारच थोडे खाजगी तज्ज्ञ अशा प्रकारे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करतात. डॉ. ओक हे अशांपैकी एक असून गेली १३ वर्षे दर रविवारी शहापूर उपजिल्हा रुग्णालय, अलीबाग जिल्हा रुग्णालय, पनवेल रुग्णालय तसेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाऊन लहान मुलांवरील जटील शस्त्रक्रिया करतात.

हेही वाचा…ठाणे जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू कक्ष कमी वजनाच्या बाळांसाठी जीवनदायी !

डॉ ओक यांचा वाढदिवस २४ नोव्हेंबर असून निवडणुकीमुळे त्या दिवशी फक्त शहापूर उपजिल्हा रुग्णालयात ११ बालकांच्या शस्रक्रिया करण्यात आल्या.त्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिव रुग्णालयात साधारण ३५ शस्रक्रिया डॉ ओक व टीमने केल्या. तर रविवारी ठाणे जिल्हा रुग्णालयात ७२ शस्रक्रिया करून डॉ ओक यांनी आपला वाढदिवस साजरा केला.

या बालरुग्णांना हायड्रोसिल, हार्निया, लघवीच्या जागेवरील त्रास, छोट्या गाठी,अॅपेंडिक्स, दुभंगलेले ओठ तसेच जॉईंट फिंगर म्हणजे चिकटलेली बोटे आदी प्रकारचा त्रास असल्यामुळे शस्त्रक्रियेची आवश्यता होती. मात्र आर्थिक परिस्थितीअभावी त्यांच्या पालकांना या शस्रक्रिया करणे परवडणारे नव्हते. डॉ ओक यांच्याबरोबर शीव रुग्णालयाचे डॉ पारस कोठारी, डॉ अभय गुप्ता, डॉ नम्रता कोठारी, डॉ यतीन खैरनार ,डॉ तुळशीदास मंगे, डॉ मनिष कोटवानी, डॉ शाहाजी देशमुख, डॉ मैत्रेयी सावे, डॉ आदिती दळवी, डॉ सुकन्या विंचुरकर, डॉ प्रतिक्षा जोशी, डॉ मुग्धा नायक तसेच ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉ एन. रोकडे व विनोद जोशी यांचा शस्त्रक्रियेत सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा…पशुगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

डॉ. ओक यांनी आतापर्यंत वैद्यकीय व सामाजिक विषयावर ५३ पुस्तके लिहिली असून वाढदिवसानिमित्त ६५ शस्रक्रिया करण्याच्या संकल्पनेविषयी विचारले असता, ते म्हणाले की,आदिवासी दुर्गम भागातील गोरगरीब लहान मुलांच्या शस्रक्रिया करणे हे मी झाले कर्तव्य मानतो. १३ वर्षापूर्वी केईएममधून निवृत्त झाल्यापासून मी आठवड्यातील प्रत्येक रविवार आदिवासी दुर्गम भागातील गरीब लहान मुलांवर शस्त्रक्रिया करतो. अन्य खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात जाऊन गोरगरीब रुग्णांवर उपचार करावे अशी अपेक्षाही डॉ ओक यांनी व्यक्त केली.

साधारणपणे वर्षाकाठी मी वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात जाऊन ७०० ते हजार शस्त्रक्रिया करतो. ज्या जटिल शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात करता येणे शक्य नसते, अशा शस्त्रक्रिया ठाण्यातील कौशल्या रुग्णालयात केल्या जातात तर कर्करोगादी अन्य काही मोठ्या पालिकेच्या शीव रुग्णालयातही शस्त्रक्रिया करतो, असेही डॉ ओक म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seventy two children operated on in single day at thane district hospital on december 1 mumbai print news sud 02