मुंबई : राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून सुमारे ७०१ किमीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृृद्धी महामार्गापैकी नागपूर ते भरवीर ६०० कि.मी.चा मार्ग रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नवीमुंबई येथील मेट्रो प्रकल्पांचे काही टप्पे पूर्ण झाले असून प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.

मुंबईतील प्रमुख प्रकल्पांपैकी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सेतू जानेवारी २४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई सागरी किनारा रस्ताप्रकल्पाचे काम मार्च २४ अखेर ८७ टक्के पूर्ण झाले असून बिंदूमाधव ठाकरे चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा मार्ग रहदारीसाठी सुरू करण्यात आला आहे. ‘मेट्रो वन’ने रोज प्रवास करणाऱ्यांची सरासरी संख्या ४.६ लाख इतकी असून मेट्रो लाइन २ ए (दहिसर-डीएन नगर) च्या दररोजच्या प्रवाशांची सरासरी संख्या १.१७ लाख इतकी आहे. मेट्रो लाइन ७ (अंधेरी-दहिसर) ने प्रतिदिन ७२३७९ प्रवासी प्रवास करतात. पुणे मेट्रोच्या कॉरिडॉर एक व दोनने प्रतिदिन प्रवास करणाऱ्यांची सरासरी संख्या ४१ हजार असून नागपूर मेट्रोच्या प्रवाशांची संख्या ६९,७६९ इतकी आहे. नवी मुंबईतील सीबीडी ते पेंढार मेट्रो प्रकल्पही नोव्हेंबर २३ पासून सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>प्राधिकरणांना ‘झोपु’चे लक्ष्य!दोन लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश

नवी मुंबई विमानतळाचे डिसेंबर २३ अखेर ५७ टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्यातील विमानतळांवरून चार कोटी ४६ लाख प्रवाशांनी देशांतर्गत व एक कोटी १४ लाख प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला.

२८,९९१ किमी रस्त्यांची कामे पूर्णत्वास

राज्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३२५३५.७८ किमी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी २८९९१ किमी रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत विविध दुर्गम वस्त्या-गावे चांगल्या रस्त्याने जोडण्याचे काम करण्यात येते. या योजनेत मार्च २४ अखेर ३०९२२ किमीच्या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी २८५०० किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी १९ हजार ७७८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.