दक्षिण मुंबईतील नागरिकांची सर्वाधिक गैरसोय
दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट आणि फोर्ट परिसरातील टपाल कार्यालयांमध्ये पोस्टल स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘जनरल पोस्ट ऑफिस’ (जीपीओ) येथून स्थानिक टपाल कार्यालयांमध्ये पाच रुपयांच्या पोस्टल स्टॅम्पचा पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही कार्यालयांमध्ये पाच रुपयांच्या स्टॅम्पला पर्याय असलेल्या एक आणि तीन रुपयांच्या स्टॅम्पचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना ‘जीपीओ’पर्यंत पायपीट करावी लागत आहे.
गेल्या महिन्याभरापासून स्टॅम्पचा तुटवडा आहे. दक्षिण मुंबईतील टपाल कार्यालयांमध्ये तर स्टॅम्पची तीव्र टंचाई आहे. फोर्ट येथील ‘जीपोओ’तून काही टपाल कार्यालयांना होणारा स्टॅम्प पुरवठा महिनाभरापासून खंडित झाल्याचे टपाल कर्मचारी नागरिकांना सांगत आहेत. दक्षिण मुंबईत नरिमन पॉइंट पोस्ट ऑफिस, मंत्रालयानजीकची दोन टपाल कार्यालये आणि आयुर्विमा कार्यालयानजीक असलेले एक टपाल कार्यालय अशी चार मुख्य स्थानिक कार्यालये आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून या कार्यालयात एक आणि दोन रुपयांच्या पोस्टल स्टॅम्पचा पुरवठा नियमितपणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तर सहा महिन्यांपासून ‘जीपीओ’ कार्यालयाने पाच रुपयांच्या पोस्टल स्टॅम्पचा पुरवठा करणे बंद केल्याने नागरिकांना जीपीओत जावे लागत असल्याचे असल्याचे एका टपाल कर्मचाऱ्याने सांगितले.
२० ग्रॅमच्या टपालावर पाच रुपयांचा स्टॅम्प लावावा लागतो. मात्र सध्या स्थानिक टपाल कार्यालयांमध्ये पाच रुपयांच्या स्टॅम्पचा पुरवठाच बंद केल्याने टपाल कर्मचाऱ्यांना पर्यायी एक आणि तीन रुपयांचे स्टॅम्प द्यावे लागत आहेत. परंतु काही टपाल कार्यालयांमध्ये एक आणि तीन रुपयांचे स्टॅम्पही उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गरसोय होत आहे.
पाच रुपयांच्या स्टॅम्पच्या कमतरतेमुळे आम्ही ग्राहकांना तीन रुपयांचा एक आणि एक रुपयांचे दोन स्टॅम्प देत होतो. मात्र महिनाभरापासून एक रुपयांच्या स्टॅम्पचा पुरवठाही बंद झाल्याने तीन रुपयांचे स्टॅम्प उपयोगात येत नसल्याची माहिती आयुर्विमा कार्यालयानजीक असलेल्या टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिली. आम्ही ग्राहकांना जीपीओ कार्यालयात जाण्याचा सल्ला देत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात माहिती घेण्यासाठी जीपीओतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.