२३ लाख लिटर पाण्याची गरज असताना पुरवठा अवघे ८-९ लाख लिटर
लातूरला रेल्वेगाडीद्वारे पाणीपुरवठा, नवी मुंबई-ठाण्यासाठी दिघा धरणातून पाणी असे निर्णय घेऊन दुष्काळात पाणीसंकट काहीसे कमी करणाऱ्या मध्य रेल्वेचे मुख्यालय मात्र दिवसेंदिवस तहानेने व्याकूळ होऊ लागले आहे. मुंबईतीलच नव्हे तर देशातील प्रमुख स्थानकांमध्ये असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी स्थानकाची रोजची गरज भागवण्याइतके पाणी उपलब्ध होत नसल्याने याठिकाणी मध्य रेल्वेला टँकरचे पाणी मागवावे लागत आहे. दर दिवशी या स्थानकाला २३ ते २४ लाख लिटर पाण्याची गरज भासते, मात्र प्रत्यक्षात सध्या या स्थानकाला पालिकेकडून आठ ते नऊ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीएसटी स्थानकातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये पाणी भरण्यापासून त्या धुण्यापर्यंत अनेक कामे येथे होतात. या स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे ४१० डबे आहेत. या डब्यांत पाणी भरण्यासाठी प्रत्येक डब्यासाठी १८०० लिटर पाणी लागते. डबे धुण्यासाठी आधी १८०० लिटर पाणी लागत होते, मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ही गरज ७०० लिटरवर आणण्यात आली आहे. म्हणजेच केवळ लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे डबे धुणे व त्यात प्रवासी वापरासाठी पाणी भरणे एवढय़ासाठी तब्बल ११ लाख लिटर पाणी लागते.
त्याशिवाय या स्थानकातील कार्यालयीन कामासाठी ८ लाख लिटर पाणी दर दिवशी लागते. या स्थानकात मध्य रेल्वेचे मुख्यालय, मुंबई विभागाचे मुख्यालय, वाणिज्य इमारत आदी अनेक इमारती आहेत. तसेच स्थानक स्वच्छतेसाठीही पाच ते सहा लाख लिटर पाण्याची गरज आहे. म्हणजे सीएसटीला २३ लाख लिटर पाणी दर दिवशी लागते.
महापालिका पूर्वी या स्थानकाला १३ लाख लिटर म्हणजेच निम्मे पाणी दर दिवशी पुरवत होती, मात्र सध्या पालिकेकडून सीएसटी स्थानकाला फक्त ८ लाख लिटर पाणी पुरवले जात आहे. सीएसटी स्थानक परिसरात असलेल्या पाणी पुन:प्रक्रिया केंद्रातून २.५ लाख लिटर पाणी रेल्वेला दर दिवशी मिळते. तसेच येत्या मे महिन्यात असेच एक केंद्र रेल्वे पुनरुज्जीवित करणार असून त्यातून ६.५ लाख लिटर पाणी दर दिवशी मिळणार आहे. तरीही उर्वरित सहा लाख लिटर पाण्याची गरज भागवण्यासाठी रेल्वेला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, परंतु टँकरमालक सवलतीच्या दरात पाणी देत नसल्याने हा खर्च रेल्वेला परवडेनासा झाला आहे. ‘टँकरचे पाणी विकत घेणे आम्हाला परवडत नाही. स्थानकाची गरज भागवण्यासाठी आम्ही याच परिसरातील तीन विहिरी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हे काम पावसाळ्यानंतरच यशस्वी होईल,’ असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएसटी स्थानकाला दर दिवशी लागणारे पाणी
* एकूण पाण्याची गरज – २३ ते २४ लाख लिटर
* लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या एका डब्यात भरण्यासाठी -१८०० लिटर
* लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या एक डबा धुण्यासाठी लागणारे पाणी – ७०० लिटर
* लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या एकूण डब्यांची संख्या – ४१०
* स्थानकातील कार्यालयीन कामासाठी – ८ लाख लिटर
* स्थानक स्वच्छतेसाठी – ५ ते ६ लाख लिटर

सीएसटी स्थानकाला दर दिवशी लागणारे पाणी
* एकूण पाण्याची गरज – २३ ते २४ लाख लिटर
* लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या एका डब्यात भरण्यासाठी -१८०० लिटर
* लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या एक डबा धुण्यासाठी लागणारे पाणी – ७०० लिटर
* लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या एकूण डब्यांची संख्या – ४१०
* स्थानकातील कार्यालयीन कामासाठी – ८ लाख लिटर
* स्थानक स्वच्छतेसाठी – ५ ते ६ लाख लिटर