मुंबई : राज्यात गेल्या आठवडाभरात करोनाच्या रुग्णसंख्येत सुमारे दीडपटीने वाढ झाली असली तरी मृतांची संख्या अत्यल्प आहे. करोनाचा प्रसार वाढत असला तरी सध्या संसर्गाची तीव्रता सौम्य असल्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यात करोना संसर्गाचा प्रसार पुन्हा झपाटय़ाने वाढत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या काळात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पाचशेच्या घरात होता. जूनच्या पहिल्या आठवडय़ात यात वेगाने वाढ होऊन आता तो जवळपास दीड हजारांपर्यंत गेला आहे. तिसरी लाट ओसरण्याच्या काळात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एवढी रुग्णसंख्या दरदिवशी आढळत होती. राज्यात प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे येथे नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येत आठवडाभरात अनुक्रमे १३५ आणि १९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याखालोखाल पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे.

रुग्णसंख्येत दरदिवशी भर पडत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्याही सात हजारांवर गेली आहे. मुंबईत सर्वाधिक ५ हजार २३८ रुग्ण उपचाराधीन आहेत. याखालोखाल ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी ही वाढ काही जिल्ह्यांमध्येच आहे. त्यामुळे सध्या या प्रसाराला चौथी लाट असे म्हणता येणार नाही. रुग्णवाढ गेल्या आठवडाभरात वेगाने होत आहे. परंतु त्या तुलनेत मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. करोनाच्या या संसर्गाची तीव्रता सौम्य असल्याचे आढळत आहे. त्यामुळे सध्या तरी चिंतेचे कारण नाही. सर्तक राहून जनुकीय चाचण्या, मुखपट्टीचा वापर आणि करोना चाचण्यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.

तिसरी लाट ओसरल्यापासून मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात एप्रिलमध्ये १६ मृत्यू झाले होते. मे महिन्यात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मे महिन्यापासून संसर्ग वाढत असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही ही आशादायक बाब आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपायांवर भर द्यावा आणि सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवता येतील. परदेशांमध्ये लस न घेतेलले, वर्धक मात्रा न घेतलेले किंवा याआधी करोना न झालेल्यांना बाधा होत असल्याचे आढळले आहे. या दृष्टीने संसर्गाची तीव्रता फारशी नसली तरी बाधितांचे बारकाईने विश्लेषण होणे आवश्यक आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

२५ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण कमी

संसर्ग वाढत असल्याने राज्यातील बाधितांचे प्रमाणही सुमारे पाच टक्क्यांवर गेले आहे. परंतु करोनाचा प्रसार हा मुंबई, पुणे यासह काही जिल्ह्यांमध्येच वाढत असून येथे बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांहून जास्त आहे. रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण दोन टक्क्यांच्या खाली आहे. उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

मृत्यूचे प्रमाण कमी

रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर चढत असला तरी मृतांचे प्रमाण अजूनही अल्प आहे. आठवडाभरात राज्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत सुमारे साडेचार टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात सध्या सुमारे १ टक्का रुग्णांची स्थिती गंभीर असून यामधील केवळ तीन रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत, तर ५८ रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे.

मुंबईत ६७६ नवे रुग्ण

मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी मात्र त्यात घट दिसून आली. मुंबईत सोमवारी ६७६ नवे रुग्ण आढळले, तर शून्य मृत्यूची नोंद झाली.  मुंबईत सोमवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी ५४ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्यातील पाच रुग्णांना प्राणवायूची गरज भासली. शिवाय दिवसभरात ३१८ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या मुंबईत ५,२३८ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत ६ हजार ८९७ चाचण्या करण्यात आल्या.

Story img Loader