गाळातूनही मतांची ‘मलई’ लाटण्याचा राजकारण्यांचा प्रयत्न
मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा उद्घाटन सोहळा आपल्या हस्ते व्हावा असा हट्ट धरत काही ठिकाणी राजकारण्यांनी नालेसफाईच्या कामात मोडता घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाचा साग्रसंगीत उद्घाटन सोहळा उरकल्यानंतर कंत्राटदारांना सफाईची कामे हाती घ्यावी लागली. आता तर टक्केवारी मागण्यासाठीकाही राजकारणी आणि गावगुंड नाल्याकाठी फेऱ्या मारू लागले आहे. त्यामुळे हतबल कंत्राटदारांनी थेट आयुक्तांकडेच दाद मागितली आहे.
दरम्यान, अशा स्वरुपाच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या असून त्याची शहानिशा करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी पावसाळ्यात करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यानंतर पालिका प्रशासनाने अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र त्याचे पडसाद यंदा नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेवर उमटले. काही नाल्यांच्या सफाईसाठी तीन-चार वेळा निविदा मागवूनही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नालेसफाईची कामे सुरू करण्यास यंदा विलंब झाला.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने कंत्राटदारांना नालेसफाईचे कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर स्थायी समितीने याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यानंतर प्रशासनाने कार्यादेश दिल्यानंतर कंत्राटदाराच्या कामगारांनी साफसफाई करण्यासाठी नाल्याकाठी धाव घेतली. मात्र नालेसफाईच्या कामाचे आपल्या हस्ते उद्घाटन करावे आणि मगच कामाला सुरुवात करावी, असा हट्ट अनेक ठिकाणच्या नाल्याकाठी कार्यकर्त्यांसमवेत पोहोचलेल्या राजकारण्यांनी धरला होता. राजकारणी मंडळी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे अखेर अनेक ठिकाणच्या कंत्राटदारांना सुरू केलेली कामे थांबविणे भाग पडले. नालेसफाईच्या कामाचा उद्घाटन सोहळा आपल्या हस्ते करता यावा यासाठी काही ठिकाणी राजकारण्यांनी कंत्राटदारांना मारहाणही केल्याच्या घटना घडल्या आहेत.
काही कंत्राटदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र कंत्राटदारांची तक्रार नोंदवून घेण्याबाबत असमर्थता व्यक्त करण्यात आल्याने त्यांना माघारी यावे लागले. राजकारण्यांनी केवळ नालेसफाईची कामे थांबविली नाहीत, तर उद्घाटनासाठी आलेला सर्व खर्च कंत्राटदारालाच करण्यास भाग पाडण्यात आल्याचेही समजते. प्रशासनाने नालेसफाईच्या कामाचा कार्यादेश दिल्यामुळे ही कामे करावीच लागणार आहेत.
त्यामुळे राजकारण्यांशी वैर घेण्यात अर्थ नाही, असा विचार करून काही कंत्राटदारांनी निमूटपणे हा त्रास सहन केला. नालेसफाईच्या कामाचा उद्घाटन सोहळा आपल्या समर्थकांसमवेत मोठय़ा झोकात पार पाडल्यानंतर राजकारण्यांकडून कामे करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला. यामध्ये दोन-तीन दिवस वाया गेले.
नाल्याकाठची व्यथा इथवरच थांबलेली नाही. आता अन्य काही राजकारणी आणि गावगुंड नालेसफाईच्या कंत्राटातील टक्केवारी मागण्यासाठी नाल्याकाठी खेटे घालू लागले आहेत. टक्केवारीची मागणी करणाऱ्यांच्या तावडीतून कसे सुटायचे, असा यक्षप्रश्न कंत्राटदारांपुढे उभा राहिला आहे. या संदर्भात अनेक कंत्राटदारांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत.