रुळांलगत पिकणाऱ्या भाज्यांचा हॉटेलांना पुरवठा; लागवडीसाठी गटाराच्या पाण्याचा वापर
मुंबईकरांनी इथून पुढे बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्या जरा जपूनच खाण्याची आवश्यकता सध्या निर्माण झाली आहे. कारण मुंबईतील मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांलगत पिकणाऱ्या पालेभाज्या या गटाराच्या पाण्यावर पिकविण्यात येत असून त्या किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालकांना विकण्यात येत आहेत. गटरातील सांडपाण्यातील रासायनिक पदार्थामुळे या भाज्या आरोग्याला हानीकारक असून रेल्वेने भाजी पिकवणारे गटाराचे पाणी वापरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आहारतज्ज्ञांनी केली आहे.
मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांदरम्यान छोटे वाफे करून पालेभाज्या पिकवण्यात येतात. यात पालक, चवळी, भेंडी, लाल माठ, माठ आदी भाज्यांचा समावेश आहे. मात्र, या पालेभाज्या पिकविण्यासाठी रेल्वे रुळांलगत असलेल्या गटारातील सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सांडपाण्यामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थामुळे या भाज्यांचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता काहींनी व्यक्त केली आहे. या भाज्यांमुळे पोटाचे व शरीरावर दूरगामी परिणाम करणारे गंभीर आजार होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या भाज्या रेल्वेच्याच हद्दीतील जमिनींवर पिकविण्यात येत असून यासाठी रेल्वे संबंधितांकडून मानधन घेते, तरीही रेल्वेचा या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
रेल्वेचीच योजना
रेल्वे हद्दीतील जागांचा वापर हा अतिक्रमणांसाठी करण्यात येत असल्याने रेल्वेने काही दिवसांपूर्वी ‘ग्रो मोर फूड’ या योजनेची सुरुवात केली होती. यासाठी काही ठरावीक मानधन रेल्वे संबंधित भाजी पिकविणाऱ्यांकडून घेते व त्याबदल्यात भाजी पिकविण्यासाठी जागा देते, असे रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले. गटाराच्या पाण्याच्या वापराबाबत ते म्हणाले की, रेल्वेने गटाराचे पाणी वापरण्याची कोणतीही सूचना भाजी पिकविणाऱ्यांना केलेली नाही. यासाठी जर सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली तर आम्ही नक्की कारवाई करू. मात्र रेल्वे भाजी पिकवणाऱ्यांकडून किती मानधन घेते हे आता सांगणे शक्य नाही, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठे पिकतात भाज्या?
कळवा, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला कारशेड, सायन, माटुंगा, दादर, करी रोड, भायखळा, चिंचपोकळी या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांच्या दुतर्फा व रुळांच्या मध्ये या भाज्या पिकविण्यात येतात. प्रत्येक स्थानकादरम्यान २० ते २५ छोटे वाफे करून पालेभाज्यांची शेती करण्यात येते. यासाठी नजीकच्या गटारातील सांडपाण्याचा वापर भाज्या पिकविण्यासाठी करण्यात येतो. हे भाजी पिकवणारे बहुतांश परप्रांतीय असून ते किरकोळ विक्रेते, हॉटेलचालक अथवा बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांना भाज्या घाऊक दराने देतात. यात सर्व पालेभाज्या या सहा ते सात रुपये एक जुडी या दराने तर भेंडी पंधरा रुपये किलो दराने विकण्यात येते.

रेल्वे रुळांलगत पिकविण्यात येणाऱ्या भाज्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणावर लेड, आर्सेनिक, मक्र्युरी आदी जड धातूंचा समावेश असतो. पाण्यातील या धातूंवर पिकवलेल्या भाज्या खाल्ल्यास त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा भाज्या कच्च्या खाल्ल्यास तात्काळ पोटाचे विकार उद्भवू शकतात. या भाज्या खाण्यापूर्वी नीट धुऊन न घेतल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
– डॉ. रत्नाराजे थार, आहारतज्ज्ञ