मुंबईमधील विविध ठिकाणचे लहानमोठे नाले आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामांची तब्बल २८४.४८ कोटी रुपयांची कंत्राटे स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत चर्चेविनाच कंत्राटदारांच्या खिशात टाकण्यात आली. सत्यनारायणाची आटोपशीर पूजा उरकावी अशा पद्धतीने गुणगुणत स्थायी समिती अध्यक्षांनी प्रस्ताव मंजूर केले. एरवी विविध विषयांवरून राजकारण करीत बहु बडबडणाऱ्या नगरसेवकांनी नालेसफाईची कंत्राटे मंजूर होताना एक चकार शब्दही काढला नाही. तसेच नाले-नदीतील गाळ टाकणार कुठे, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
दरवर्षी मोठा गाजावाजा करीत १ एप्रिलपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. मात्र नालेसफाई आणि त्या कामांची पाहणी केल्यानंतरही मुंबईकरांना पावसाळ्यात जलमय होणाऱ्या रस्त्यांतूनच वाट काढावी लागते. यंदाही प्रशासनाने नाले आणि मिठी नदीतून गाळ उपसण्याच्या कामांसाठी २८४.४८ कोटी रुपयांच्या कंत्राटांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केले होते. मुळात हे प्रस्ताव जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीसमोर आणणे अपेक्षित आहे. परंतु कामे सुरू झाल्यानंतर हे प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी बैठकीत सादर करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ वस्तू, पोषण आहार असो वा अन्य कामांचे प्रस्ताव, भाजपसह मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक कंठशोष करीत प्रशासनावर गरळ ओकत असतात. मात्र नालेसफाईच्या कामांचे प्रस्ताव विलंबाने स्थायी समितीत सादर झाल्यानंतरही या पक्षांच्या नगरसेवकांनी एक चकार शब्दही काढला नाही. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दहा मिनिटांमध्ये प्रस्ताव पुकारत मंजूर करून टाकले. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी मिठाची गुळणी घेतल्यामुळे नाले-नदीतून उपसलेला गाळ कंत्राटदार कुठे टाकणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
मोठय़ा नाल्यातील गाळ उपसण्यासाठी १४१.०४ कोटी रुपयांची, तर छोटय़ा नाल्यांच्या सफाईसाठी ६८.७१ कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली आहेत. मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी ५२.३१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. त्याशिवाय चेंबूर परिसरातील रफीनगर नाल्याच्या मोरीपासून सुभाषनगर नाल्यापर्यंतचा कच्चा नाला वळविणे, रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामासाठी २२.४२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी नाले, नदीतील गाळ आणि अन्य कामांसाठी एकूण २८४.४८ कोटींची कामे देण्यात आली.

Story img Loader