लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दक्षिण मुंबईहून अटल सेतूला अतिजलद पोहचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ४.५ किमीचा शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मागील काही वर्षापासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. पण आता मात्र हे काम वेग घेणार आहे. कारण या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून आता लवकरच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या प्रभादेवी (एल्फिन्स्टन) पुलाच्या जागी नवीन दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांतच सध्याचा प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याचे पाडकाम केले जाणार असून या जागी दुमजली पूल उभारल्यानंतर प्रवासी-वाहनचालकांचा दक्षिण मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिजलद होणार आहे. दरम्यान प्रभादेवी पूल किमान एक वर्ष बंद राहणार आहे.

दक्षिण मुंबईतून, सागरी मार्गावरुन थेट अटल सेतूला पोहचता यावे यासाठी एमएमआरडीएने ४.५ किमी आणि १७ रुंदीचा शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार या रस्त्याच्या कामास २०२१ मध्ये कंत्राटदार जे. कुमार कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. हा मार्ग जमिनीपासून १५ ते २७ मीटर इतका उंच आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी १०५१.८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उन्नत मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादन, पुनर्वसन-विस्थापन, वाहतूक परवानग्या आणि इतर कारणामुळे या प्रकल्पास मोठा विलंब झाला असून मागील कित्येक महिन्यांपासून प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू होते. पण अखेर या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करण्यात एमएमआरडीएला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पात प्रभादेवी आणि शिवडी रेल्वे स्थानकावर ओलांडणी पूल बांधण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून जाणारा प्रभादेवी पूल १०० वर्षांहून अधिक जुना असून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. उन्नत रस्ता प्रकल्पात हा पूल समाविष्ट झाल्याने आता रेल्वेऐवजी एमएमआरडीएकडून प्रभादेवी पुलाची उभारणी केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुनर्बांधणीअंतर्गत सध्याच्या पुलाच्या जागी दुमजली अत्याधुनिक असा पूल बांधण्यात येणार आहे. या दुमजली पुलामुळे प्रभादेवी परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. दुमजली पुलातील पहिल्या स्तरावरून नियमित वाहनांची वाहतूक होणार आहे. तर दुसऱ्या स्तरावरून अटल सेतूवरून दक्षिण मुंबईच्या दिशेने आणि दक्षिण मुंबईतून अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक होणार आहे. त्यामुळे उन्नत रस्ता, दुमजली पुलामुळे भविष्यात प्रभादेवीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामासाठी सध्याचा पूल बंद करून तो पाडावा लागणार आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन वर्षे वाहनचालक-प्रवाशी, पादचाऱ्यांची गैरसोय होणार आहे. मात्र त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. शक्य तितक्या लवकर दुमजली पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रभादेवी पुलाच्या पाडकामास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता. मात्र १० वी, १२ वीच्या परीक्षा लक्षात घेऊन फेब्रुवारीत पाडकाम करण्यास विरोध होताना दिसत आहे. असे असले तरी लवकरात लवकर पाडकाम करून दुमजली पुलाच्या कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. सध्या आम्हाला रेल्वे आणि वाहतूक पोलिसांच्या ‘ना हरकरत’ प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. ‘ना हरकत’ प्रमाणपत्र प्राप्त झाले की प्रभादेवी पूल बंद करून कामास सुरुवात केली जाईल, असे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून आता कामाला वेग देत येत्या दीड-दोन वर्षात उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.