बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता शाहरुख खानवर गर्भलिंग निदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून, राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी हे सरोगसी पद्धतीने आपल्या तिसऱया अपत्याला लवकरच जन्म देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ही बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. याच अपत्याची लिंग निदान चाचणी केल्याचा आरोप शाहरुखवर करण्यात आला आहे. मुंबईतील एका रुग्णालयात शाहरुखने सरोगसी पद्धतीने बाळाला जन्म देणाऱया महिलेच्या पोटातील गर्भाचे लिंग तपासल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेकडूनही संबंधित रुग्णालयाची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, शाहरुखने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.