मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व भाजपचे खासदार डॉ. सत्यपालसिंह यांनी भाडय़ाने दिलेल्या सदनिकेत देहविक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनैतिक व्यवहार प्रतिबंधक (पीटा) कायद्यान्वये कारवाई करणाऱ्या समाजसेवा शाखेने सदनिका ‘सील’ करणे मात्र टाळले आहे. अशा प्रकरणात सरसकट सदनिका सील केली जाते. मात्र, माजी आयुक्तांची सदनिका अपवाद ठरली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पीटा कायद्यातील कलम सातचा भंग झाल्यास सदनिका सील करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. देहविक्रय चालत असलेले ठिकाण शाळा, रुग्णालय, वसतिगृह, मंदिर आदींच्या जवळ असल्यास कलम सातचा अवलंब केला जातो. सत्यपालसिंह यांच्या सदनिकेशेजारीच अंबानी रुग्णालय आहे. तरीही कलम सातचा वापर करून सदनिका सील करण्यात न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले
जात आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या अंधेरी पश्चिमेतील चार बंगला या मोक्याच्या ठिकाणी पाटलीपुत्र या सोसायटीतील दहाव्या मजल्यावर सत्यपाल यांची सदनिका आहे. ही सदनिका ताब्यात घेतल्यापासून त्यांनी ती भाडय़ाने दिली आहे.
इंडिया बुल्स या कंपनीला भाडय़ाने दिलेल्या कराराची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याच्या दिवशीच या सदनिकेत सुरू असलेल्या देहविक्रयाविरुद्ध कारवाई करून वकील शाह याला अटक करून २० ते २२ वर्षे वयोगटातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली. या सदनिकेत यापूर्वी एक माजी उपायुक्तही भाडय़ाने राहत होते.
या सदनिकेत देहविक्रय सुरू असल्याबाबत पाटलीपुत्र सोसायटीतीलच रहिवाशांनी तक्रार केली होती आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समाजसेवा शाखेतील सूत्रांनी सांगितले.
ही सदनिका सत्यपाल यांची असल्याची पुरेपूर कल्पना होती आणि अतिवरिष्ठांच्या आदेशावरूनच ही कारवाई गोपनीयता बाळगून करण्यात आल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

जी सदनिका एका बडय़ा कंपनीला भाडय़ाने दिली आणि ज्या सदनिकेला आपण अनेक वर्षे भेट दिली नाही. त्या सदनिकेवर छापे पडावे, हा मला धक्का आहे. एका व्यक्तीच्या बेजबाबदार कृतीसोबत माझे नाव जोडणे हा खोडसाळपणा आहे. या सदनिकेचा ताबा गेले दशकभर आपल्याकडे नाही. मात्र त्यामुळे मी आणि माझा पक्ष विनाकारण बदनाम झाला आहे.मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी बोलून आपण नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.         – सत्यपाल सिंह, भाजपचे खासदार