शाळेत झालेल्या बाललैंगिक अत्याचार समुपदेशन कार्यक्रमात दोन अल्पवयीन बहिणींवरील अत्याचार उघडकीस आला. पिडीत मुलींच्या मावशीच्या पतीनेच मुलींना मारहाण करून अत्याचार केले. याप्रकरणी कुटुंबियांनी तक्रार करण्यास नकार दिल्यानंतर स्वयंसेवी संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार झालेल्या पिडीत मुलींचे वय दहा आणि बारा वर्षे आहे.
हेही वाचा >>> सायबर फसवणुकीतील १०० टक्के रक्कम परत मिळवण्यात यश, दहिसर पोलिसांची कारवाई
दोघी मुलींच्या शाळेत १ डिसेंबर रोजी एका स्वयंसेवी संस्थेद्वारे बाललैंगिक शोषणासंबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव करून देण्यात आली. त्यावेळी मुलींनी त्यांच्यावर मावशीच्या पतीने केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. या मुलींचा सांभाळ करण्याच्या बहाण्याने २०१९ मध्ये मुलींचे वय ८ आणि ६ वर्षे असताना मुलींना मारहाण करून त्याने अत्याचार केल्याचे मुलींनी सांगितले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास आई वडीलांना मारण्याची धमकी दिल्याचे सांगताच सर्वानाच धक्का बसला. त्यानंतर मुलींनी मावशीच्या घरी राहण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे ही बाब मुलीच्या आई वडिलांना सांगताच त्यांनी तक्रार करण्यास नकार दिला. अखेर, स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी स्वतः पुढाकार घेऊन या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. मुलींचे समुपदेशन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.