बोरिवली येथे सुरू असलेल्या ‘शब्दगप्पां’मध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा देशाचा इतिहास आणि संस्कृती बदलणार का’ या विषयावरील चर्चेत हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वविरोधी असे दोन गट पडले आणि शब्दगप्पांचे वातावरणही तापले.
या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, नाटककार संजय पवार, ‘भाजप’चे आमदार अतुल भातखळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत प्रचारप्रमुख प्रमोद बापट, लेखिका व स्त्रीवादी कार्यकर्त्यां वंदना भागवत हे वक्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी व दीप्ती राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या देशाची संस्कृती आणि विचार आम्हाला चांगले ठाऊक असून निधर्मीवाद्यांनी भाजप आणि रा.स्व. संघाला धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही. हिंदू हा धर्मनिरपेक्षच असल्याचे ‘स्युडो सेक्युलर’वाद्यांनी लक्षात ठेवावे. ‘घरवापसी’चा शोध पत्रकारांना आत्ता लागला असला तरी संघ परिवारातर्फे गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू असल्याचे भातखळकर म्हणाले, तर समरसता मंचातर्फे जातिभेद निर्मूलनाचे कामही सुरू असल्याची माहिती बापट यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेने लादलेले तिरस्कृत व बहिष्कृत आयुष्य बदलायचे असेल, तर हिंदूू धर्माचा त्याग करावा लागेल, असे मत व्यक्त केल्यानंतर २० वर्षांनी धर्मातर केले. त्या दोन दशकांत त्यांनी घर सोडू नये म्हणून संघवाल्यांनी कोणते प्रयत्न केले, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला,
 तर बाळ म्हणाले, खोटा इतिहास मांडून इथे तिरस्कार रुजविण्याचे काम संघपरिवाराने चालविले असून विकासाच्या अजेंडय़ावर मते मागायची आणि सत्ता आल्यावर पोतडीतून हिंदुत्वाचा अजेंडा काढायचा, अशी नीती भाजपची आहे, तर आपली श्रद्धा राखूनही दुसऱ्यांच्या श्रद्धेचा आदर करता येतो या खऱ्या धर्मनिरपेक्ष विचारापासून देशाला दूर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे भागवत  म्हणाल्या.