येत्या बुधवारी, २८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवतीच्या विरळ छायेमध्ये आल्याने छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. भारतातूनही हे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे, असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
या विषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की, या दिवशी चंद्र पूर्व क्षितिजाखाली असताना ५.४५ वाजता पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल.मुंबई येथे सायंकाळी ५.५१ मिनिटांनी ग्रहणातच चंद्र उगवेल आणि रात्री १०.२१ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल. या चंद्रग्रहणाला ‘मांद्य चंद्रग्रहण’ असेही म्हणतात. नेहमीच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेमध्ये आल्याने काळसर तपकिरी रंगाचा दिसतो. परंतु अशा प्रकारच्या छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र फक्त म्लान – कमी तेजस्वी दिसतो. अशा प्रकारच्या छायाकल्प चंद्रग्रहणात ग्रहणविषयक कोणतीही धार्मिक नियम पाळावयाचे नसतात. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारताप्रमाणेच आशिया, पूर्व आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका येथून दिसेल. या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा नेहमीप्रमाणे साजरी करण्यास हरकत नाही, असेही सोमण यांनी सांगितले.   

Story img Loader