चित्राचे अनावरण, परिसंवाद आणि गाणी यांचा समावेश
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीअंतर्गत असलेल्या शाहीर अमरशेख अध्यासनातर्फे २० ऑक्टोबर रोजी शाहीर अमरशेख जन्मशताब्दीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरशेख यांच्या तैलचित्राचे अनावरण, परिसंवाद आणि अमरशेख यांची गाणी व पोवाडे असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
प्रसिद्ध चित्रकार वासुदेव काम यांनी रेखाटलेल्या अमरशेख यांच्या तैलचित्राचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने ‘शाहीर अमरशेख व्यक्ती, वाङ्मय, विचार’ हा परिसंवाद होणार आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात डॉ. माधव पोतदार, डॉ. जब्बार पटेल, डॉ. क्रांती जेजुरकर, डॉ. अजित नदाफ, मल्लिका अमरसेख, मधुकर नेराळे हे सहभागी होणार आहेत.या सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक कमलाकर सोनटक्के, सांस्कृतिक कार्यसंचालक अजय आंबेकर, कुलसचिव डॉ. एम. ए. खान, राही भिडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर शाहीर अमरशेख यांची गाणी, पोवाडे आदी सादर होणार आहेत. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील शाहीर अमरशेख सभागृहात सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा