‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे शुक्रवारी मुंबईमध्ये राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. शाहीर साबळे म्हणून ते महाराष्ट्रात परिचित होते. ते ९४ वर्षांचे होते.
सातारा जिल्ह्यातील पसरणी येथे एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला. गावच्या भजनी मंडळात ते गात असत. बालवयात त्यांना बासरीवादनाचाही छंद जडला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे ते त्यांच्या मामांकडे अमळनेरला गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. मात्र अमळनेरला त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. तसेच राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करुन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे ‘जागृती शाहीर मंडळ’ त्यांनी काढले.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना यामागे होती. या कार्यकमातून लावणी, बाल्यानृत्य, कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडविण्यात आले.
वृद्घ व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली. शाहीर साबळे यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांचे नातू होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा