बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने आपला येऊ घातलेला ‘दिलवाले’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफीनामा सादर केला आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण अजिबात नसून काही दिवसांपूर्वी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे शाहरुखने एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
शाहरुखने त्याच्या वाढदिवशी देशात असहिष्णुतेचे वातावरण पसरल्याचे विधान केले होते. त्यावरून शाहरुखला जोरदार टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर शाहरुखने दिलवाले चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असहिष्णूतेच्या वक्तव्यावरून घूमजाव केले. मी असं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. संकुचित मानसिकता असणारे लोक सोशल मीडियावर माझ्याबद्दल द्वेष पसरवतात. मी केलेल्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं असल्यास मी माफी मागतो, असे शाहरुख म्हणाला.
असहिष्णुतेच्या वादामुळे मी घाबरलो होतो. एवढेच नाही तर माझ्या पत्नीने कोणतेही वक्तव्य करुन तू वादात पडू नकोस, असा सूचक सल्ला दिल्याचेही शाहरुखने यावेळी सांगितले.दरम्यान, शुक्रवारी शाहरुखचा दिलवाचे चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र त्यासाठी मी हे वक्तव्य करतोय असा कोणी गैरसमज करून घेऊ नये, असे शाहरुखने स्पष्ट केले.

Story img Loader