लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेली १८ वर्षे विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यावेळी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाहीत. त्याऐवजी ते मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
कपिल पाटील यांनी २००६ पासून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे तीनदा प्रतिनिधित्व केले. यंदा त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढण्याचे टाळले आहे. त्याऐवजी शिक्षक भारतीने सुभाष मोरे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. पाटील हे मध्यंतरी संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. मात्र त्यांच्या पक्षाने बिहारमध्ये भाजपशी आघाडी केली. त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडून समाजवादी गणराज्य पार्टी हा पक्ष स्थापन केला. हा पक्ष राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढण्याची त्यांची योजना आहे.