‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत’, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अब्दुल सत्तारांच्या या विधानावरून शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – VIDEO: शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यामागे…”
काय म्हणाले शंभूराजे देसाई?
अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान अनावधानाने झालं आहे. त्यांची आणि माझी आज सकाळीच चर्चा झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विभागाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला असल्याचेही सांगितलं. मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजे, याबाबत दुमत नाही. पण तरीही त्या होतात, असा त्यांच्या बोलण्याचा ओघ होता, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच याबाबत अब्दुल सत्तार विधानसभेत स्पष्टीकरण देतील, असंही ते म्हणाले.
हेही वाचा – आदित्य ठाकरे विरूद्ध आशिष शेलार, दोन्ही आमदार सभागृहात एकमेकांना भिडले; नेमकं झालं काय?
दरम्यान, छगन भुजबळ यांनी कांद्याच्या अनुदानावर बोलताना शिंदे सरकारने दिलेलं अनुदान म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार असल्याचे म्हटलं होते. यावरही शंभूराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. भुजबळांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांना किती अनुदान मिळालं, याची माहिती घ्यावी. खरं तर त्यांच्या पेक्षा १०० रुपये आम्ही वाढवून दिले. जे त्यांना शक्य झालं नाही, ते आम्ही केलं. स्वत: त्यांनी एवढी रक्कम कधी दिली नाही आणि आम्ही दिली तर ते स्वीकारायला तयार नाहीत, असे ते म्हणाले.