मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. सिनेटच्या निवडणूक घेण्यासाठी मिंधे-भाजपाचं सरकार घाबरत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर डरपोक मुख्यमंत्र्यांचा दबाब होता का? की मुख्यमंत्री घाबरत आहेत. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप होऊ शकत नाहीये. यानंतर किमान मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका तरी होतील, असं आम्हाला वाटलं. मात्र, या निवडणुकीला सामोरं जायलाही ते घाबरत असतील, तर आपण समजायचं तरी काय?” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
“एवढी सगळी फोडाफोड करूनही ते घाबरत आहेत”
“एवढी सगळी फोडाफोड करूनही ते घाबरत आहेत. त्यांनी दोन पक्ष फोडले. एक कुटुंब फोडलं. महाशक्ती स्थापन केली, एक मुख्यमंत्री, दोन भारदस्त उपमुख्यमंत्री नेमले. त्यांचे आकडे कोणालाच माहिती नाहीत की किती लोक कोणाबरोबर आहेत. महाशक्ती त्यांच्याबरोबर असूनही मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक घेण्यास मिंधे-भाजपाचं सरकार घाबरत असेल, तर काय उपयोग आहे,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
हेही वाचा : रोहित पवारांनी अजित पवारांबाबत व्यक्त केली ‘ही’ भीती; म्हणाले, “भाजपाबरोबर गेलेल्या…”
“सरकार विद्यापीठाच्या कामात हस्तक्षेप करत नाही”
यावर बोलताना शंभुराज देसाई म्हणाले, “सिनेट निवडणुकीचा थेट संबंध राज्य सरकारच्या कामाकाजाशी येत नाही. विद्यापीठ प्रशासनाच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जातात. राज्य सरकार विद्यापीठाच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप करत नाही. सरकार वेळोवेळी निवडणुकीला सामोरे गेलं आहे.”
हेही वाचा : “एका भाकरीची अर्धी व आता चतकोर झालीये, त्यात…”, भरत गोगावलेंची ‘त्या’ विधानावर स्पष्टोक्ती!
“महायुती पहिल्या क्रमाकांवर राहिल”
“दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिलं आहे. ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीतही पहिल्या क्रमांकावर महायुती राहिली आहे. आता अजित पवारही बरोबर आल्याने इथून पुढील प्रत्येक निवडणुकीत महायुती पहिल्या क्रमाकांवर राहिल,” असा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.