मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांनंतर  सरकारमधील छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि डॉ. विजयकुमार गावित या तीन मंत्र्यांना गेल्या दोन दिवसांत दिलगिरी व्यक्त अथवा माघार घ्यावी लागली आहे. विशेष म्हणजे तिन्ही मंत्र्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करीत स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल, दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल तर डॉ. विजयकुमार गावित यांनी मासे खाल्ल्याने  डोळय़ांबद्दल  विधाने केली होती. त्याची राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात प्रतिक्रिया उमटली होती. ब्राह्मण समाजाबद्दल छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली. ‘मी जे काही बोललो त्यात  कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, अशी सारवासारव भुजबळ यांनी केली.

राजकीय उंची गाठूनही शरद पवार यांना स्वबळावर मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही, असे वक्तव्य सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. वळसे-पाटील यांनी शरद पवार यांचे सचिव म्हणून त्यांच्या कारकीर्दीस सुरुवात केली. पण पवारांच्या कारकीर्दीबद्दल वळसे-पाटील यांनी केलेल्या विधानामुळे  शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली. या वादावर पडदा टाकताना वळसे-पाटील यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका घेतली.

‘मासे खाल्ल्याने ऐश्वर्या राय हिचे डोळे सुंदर आहेत’ किंवा अन्य मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे  अडचणीत आले होते. महिला संघटनांनी केलेल्या टीकेनंतर डॉ. गावित यांनी माघार घेत आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला.

गावित यांना महिला आयोगाची नोटीस

अभिनेत्री ऐश्वर्या रायसह तरुण मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महिला आयोगाने मंत्री डॉ. गावित यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shame on three ministers for backtracking after a controversial statement ysh