गेली ४० वर्षे केईएममध्ये उपचार घेत असलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळली होती. मात्र उपचारांना त्यांनी दाद दिली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शानबाग यांना शुक्रवारी श्वसनाचा त्रास सुरू झाला तसेच त्यांना तापही येत होता. त्यांचे वयही ६५ वर्षे झाल्याने कोणत्याही बाबतीत जोखीम घेता येत नव्हती. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला. ‘शानबाग यांना दुसऱ्या खोलीत हलवणे शक्य नसल्याने त्यांच्या खोलीतच ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला. न्युमोनिया झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांनीही उपचारांना दाद दिली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे,’ अशी माहिती केईएमच्या कार्यवाहक अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले. शानबाग यांचे वय अधिक असल्याने तसेच न्युमोनिया हा गंभीर आजार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा ऑक्सिजन पुरवठा सुरूच ठेवण्यात आला आहे.
३७ वर्षे कोमात
१९७३ मध्ये केईएम रुग्णालयात वॉर्डबॉयने केलेल्या हल्ल्यानंतर अरुणा शानबाग कोमामध्ये गेल्या आहेत. गेली चाळीस वर्षे त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. दरवर्षी त्यांचा वाढदिवसही साजरा केला जातो. काही वेळा त्यांच्या प्रकृतीत चढउतार होतात. मात्र केईएमच्या परिचारिकांनी त्यांचा सांभाळ केला. तब्बल ३७ वर्षे कोमात असलेल्या अरुणा यांना दयामरण द्यावे, अशी याचिका पत्रकार पिंकी विराणी यांनी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती़.

Story img Loader