बंगळुरुमधील राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्थेत आयोजन; वैज्ञानिकांकडून निषेध

सध्या देशात भारतीय पुराणांना विज्ञानाशी जोडून त्याचे पौराणिक कथांचे उद्दात्तीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. यात आता वैज्ञानिक संस्थांचीही साथ मिळू लागल्याने अशा कार्यक्रमांना अधिकच बळ येऊ लागले आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी बंगळूरु येथील विज्ञान संस्थेतील राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्थेत ‘आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय बुद्धिमत्ता यातील सत्य’ याबाबत व्याख्यान देण्यासाठी पुरी पीठाचे पूज्यपद जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा वैज्ञानिक वर्तुळात नाराजीचा सूर उमटला आहे.

देशात होत असलेल्या विज्ञानाच्या गळचेपीविरोधात काही महिन्यांपूर्वी देशभर वैज्ञानिकांनी निदर्शने केली. वैज्ञानिक रस्त्यावर उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा असे म्हणण्यास हरकत नाही. यातच नोव्हेंबर महिन्यात विज्ञान संस्थेने ‘ज्योतिषशास्त्रावर’ दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. याला देशभरातील विज्ञानवाद्यांकडून कडाडून विरोध झाल्यानंतर ही कार्यशाळा रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा शंकराचार्याना व्याख्यानाला निमंत्रण दिल्यामुळे राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्थेच्या विरोधात टीका सुरू झाली आहे. संस्थेत ११ ते २२ डिसेंबर या कालावधीत ‘विज्ञान तंत्रज्ञान आणि समाज’ या विषयावर बहुद्देशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा भाग म्हणून ११ डिसेंबर रोजी संस्थेत या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शंकराचार्यानी १५७ पुस्तके लिहिली असून त्यातील १३ पुस्तके ही गणिताशी संबंधित आहेत. तसेच ते इस्रो, आयआयएम, आयआयटी कानपूर, डीआरडीओ, आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठ अशा संस्थांमधील वैज्ञानिकांशी सतत संपर्कात असतात व तेथील कार्यक्रमाला उपस्थित असतात असे संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निमंत्रणात म्हटले आहे. मात्र या कार्यक्रमाला देशभरातील वैज्ञानिकांकडून विरोध होत आहे. प्राचीन भारतीय बुद्धिमत्ता आणि आधुनिक विज्ञान या विषयाची सांगड घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे अनेक वैज्ञानिक आपल्या देशात आहेत. त्यांना बगल देऊन केवळ पुराणांचे उद्दात्तीकरण करणाऱ्यांना अशा कार्यक्रमांना निमंत्रण देणे चुकीचे असल्याचे मत टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील प्रा. डॉ. मयांक वाहिया यांनी व्यक्त केले. प्रगत शिक्षण संस्था तसेच विज्ञान संस्थांसारख्या प्रतिथयश संस्थांनी असे करणे म्हणजे खेदजनक बाब असल्याचेही ते म्हणाले. तर या व्याख्यानाला संस्थेतील वैज्ञानिकांनीही विरोध केला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे बंगळुरू येथील विज्ञान संस्थेतील एका प्राध्यापकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

या संदर्भात राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्थेचे संचालक बदलदेव राज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Story img Loader