मुंबई : ज्येष्ठ साहित्यिका शान्ता शेळके  यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या प्रसिद्ध कविता व गीतांचा शब्दोत्सव ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ वितरण सोहळ्यात साजरा केला जाणार आहे. येत्या गुरुवारी शिवाजी पार्क  येथील स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक येथे सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जीवनगाणी’ संयोजित या शब्दोत्सवात अभिनेत्री मधुरा वेलणकर, ऐश्वर्या नारकर आणि अनुश्री फडणीस शान्ता शेळके  यांच्या निवडक कवितांचे वाचन करणार आहेत. तर केतकी भावे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे त्यांच्या प्रसिद्ध गीतांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री हेमांगी कवी करणार आहेत. ‘करोना’संबंधीचे सर्व नियम पाळून होणाऱ्या या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका रसिकांसाठी ‘प्रत्येक व्यक्तीस एक’ याप्रमाणे कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांमधून निवडलेल्या नऊ ‘दुर्गा’चा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने आणि ऊर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते सन्मान के ला जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना यंदाच्या दुर्गाच्या हस्ते ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. 

‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमांतर्गत दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे. यंदा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परित्यक्ता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अरुणा सबाने, प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणाऱ्या डॉ. मेधा ताडपत्रीकर, रेशमाच्या किडय़ांपासून निघणाऱ्या स्रावाचा मानवी उपचारांसाठी उपयोग करण्याबाबतचे संशोधन करणाऱ्या डॉ. अनुया निसळ, रत्नांची पारख करण्याच्या शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. जयश्री पंजीकर, ओडिसी नृत्यातील ज्येष्ठ नृत्यांगना व वंचितांना नृत्य शिक्षणात सामावून घेणाऱ्या नृत्यगुरू झेलम परांजपे, लैंगिक अत्याचारपीडित व कचरावेचक व्यक्तींसाठी काम करणाऱ्या वृषाली मगदूम, गडचिरोलीत आदिवासी स्त्रियांचे संघटन उभे करणाऱ्या शुभदा देशमुख, दृष्टिहीनतेवर मात करून जर्मन भाषेत ‘पीएच.डी.’ मिळवणाऱ्या डॉ. उर्वी जंगम, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या आहेत.

या कार्यक्रमाच्या प्रवेशिका सकाळी ११ ते ५ या वेळेत नाटय़गृहावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर त्या देण्यात येणार आहेत.

मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हीटस् फाऊंडेशन

सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, व्ही.पी. बेडेकर अँड सन्स प्रा. लि., सनटेक रिअल्टी लि., बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलडाणा

पॉवर्ड बाय : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

 टेलिव्हिजन पार्टनर :  एबीपी माझा