‘बदलणाऱ्या महाराष्ट्रा’चा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील शेती क्षेत्रातील सद्यस्थितीचा वेध घेण्यासाठी ‘शेती आणि प्रगती’ यावर चर्चासत्र होणार आहे. ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ शरद जोशी, सहकारातील बुजुर्ग नेते बाळासाहेब विखे पाटील, पद्मश्री शरद काळे, इस्रायलचे वाणिज्यदूत जोनाथन मिलर यांच्यासारखी नामवंत मंडळी बदलत्या शेतीचा, बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि बाजारपेठेचा आढावा घेतील.
कालौघात बदलत चाललेल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांचा वेध घेण्यासाठी ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू झाला. पहिल्या पर्वात शिक्षणव्यवस्था आणि दुसऱ्या पर्वात नागरीकरणाच्या आव्हानांचा वेध घेतल्यानंतर आता तिसऱ्या पर्वात कृषीक्षेत्राचा सर्वागीण वेध घेण्यात येणार आहे.
कोरेगाव पार्क येथील ‘हॉटेल ताज विवांता’ (ब्लू डायमंड) येथे होणाऱ्या या चर्चासत्रात ‘महाराष्ट्राची शेती व प्रगती’, ‘शेती व सहकार’, ‘शेती-नवे तंत्र, नवे वाण, नवे ज्ञान’ असे तीन परिसंवाद पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारीला होतील. तर २५ फेब्रुवारीला ‘शेतीतील अभिनव प्रयोग’, ‘शेती व पाणी’ आणि ‘शेतीचे अर्थकारण व भवितव्य’ या विषयांवर परिसंवाद होईल.
या चर्चासत्रांमध्ये खासदार राजू शेट्टी, अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे, शंकरराव कोल्हे, भाभा अणुसंशोधन केंद्राचे अणुशेती व जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख पद्मश्री शरद काळे, कृषी व जलतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, जैन ठिबक सिंचनचे अतुल जैन, आनंद कर्वे, राहुरी कृषीविज्ञापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, पाणीप्रश्नातील अभ्यासक अरुण देशपांडे व दि. मा. मोरे आपले विचार मांडतील. तसेच प्रयोगशील शेतकरी संजय देशमुख, डॉ. ज्ञानदेव हापसे, एन. बी. म्हेत्रे, डॉ. दत्तात्रय वणे आपले अनुभव सांगतील. कृषीतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर, निवृत्त सनदी अधिकारी व कृषीक्षेत्रातील तज्ज्ञ उमेशचंद्र सरंगी कृषीक्षेत्राचा वेध घेतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा