शरद पवार आणि शरद जोशी या शेतीत अधिक रस असलेल्या दोन शरदांमधील संबंधांची राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चा होत असते. परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी उभयतांनी आतापर्यंत कधीच सोडली नव्हती. पण मंगळवारी चक्क या दोन शरदांनी परस्परांचे तोंडभरून कौतुक केले तेव्हा उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पण भाजपबरोबरीच्या संबंधावरून शरद जोशी यांनी शरद पवार यांना असा काही चिमटा काढला की, पवारांनी त्यावर मौन बाळगणे पसंत केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत त्यांच्या नावाने देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार आणि शरद जोशी यांचे फारसे कधीच जमले नाही. ‘जोशींना शेतीचे काय कळणार,’ असा सवाल मागे पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या शेतीच्या धोरणावर शरद जोशी नेहमीच टीका करीत आले आहेत. इंडिया विरुद्ध भारत ही संकल्पना शरद जोशी यांची. या लढाईत भारत पराभूत झाला असला तरी भारताला पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शरद जोशी यांनी यावेळी केले. शेतीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून, शेतकरी पायावर उभा राहिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था फारच वाईट आहे. शेतीमंत्री म्हणून शरद पवार यांनी चांगले काम केले. शेतीच्या मुद्दय़ावर आम्ही ३० नोव्हेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. सध्याचे तुमचे राजकीय संबंध मला माहीत असले तरी या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हावे, असे शरद जोशी यांनी सांगताच पवारांसह सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. जोशी यांना पुरस्कार देण्याची शिफारस आल्यावर हे नाव झेपेल का, असा शंकेचा सूर काही जणांनी लावला होता, अशी कबुली शरद पवार यांनी दिली. आमचे दोघांचे मधुर संबंध सर्वश्रुत आहेत. कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यावर तज्ज्ञ, प्रसारमाध्यमे, राजकीय नेत्यांकडून बरीच चिरफाड झाली. पण ज्यांनी धोरणाला कायम विरोध केला त्या जोशी यांनी पाठिंबा दिला तेव्हा मलाही आश्चर्य वाटले होते. कृषी क्षेत्रातील संशोधन वा नव्या चाचण्यांना विरोध व्हायचा. पण जी.एम. फूड चाचण्यांचे जोशी यांनी समर्थन केले होते, याची आठवण पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल पंजाबमध्ये सत्कार करताना माझा उल्लेख शरद जोशी असा अनेकदा व्हायचा. शरद जोशी राज्याबाहेरही तेवढेच लोकप्रिय असल्याचे कळले, हे पवार यांनी आवर्जून सांगितले. भाजपच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याच्या शरद जोशी यांच्या आवाहनावर पवार यांनी काहीच मतप्रदर्शन केले नाही. पवार यांचे भाषण संपताच सूत्रसंचालक अंबरीश मिश्र यांनी पवार यांना त्याची आठवण करून दिली.
शेती, शेतकरी आणि शरद!
शरद पवार आणि शरद जोशी या शेतीत अधिक रस असलेल्या दोन शरदांमधील संबंधांची राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चा होत असते. परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी उभयतांनी आतापर्यंत कधीच सोडली नव्हती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2014 at 03:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad joshi honored by sharad pawar