राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार काका-पुतणे एखाद्या विषयावर परस्परविरोधी भूमिका घेतात हे यापूर्वी अनुभवास आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा सूर लावला असताना अजित पवार यांनी मात्र पुरस्काराचे समर्थन केले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका घेतली आहे. या संदर्भात सांगलीत झालेल्या सभेत हाणामारी झाली होती. त्यानंतर आव्हाड यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. आव्हाड यांना आलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. ‘आव्हाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे ओ.बी.सी. समाजातील सुविद्य नेते आहेत’, असे प्रशस्तीपत्र पवार यांनी या पत्रातून दिले होते. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या आव्हाड यांचे शरद पवार यांनी समर्थनच केले होते. शिवशाहीर पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराला विरोध करण्याची जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक भूमिका असून, ही पक्षाची भूमिका नाही, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. शिवशाहिरांचे काम निश्चितच मोठे आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या मुद्दय़ावर पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे त्यांनी मान्य केले. पुणे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अजितदादांनी पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल अनुकूल भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा