उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली बेताल वक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच महागात पडली असून, त्यातून बाहेर पडण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू झाली आहे. आतापर्यंत या वादावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सूचक मौन बाळगले असले तरी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना लक्ष्य करण्याचा विरोधकांचा प्रयत्न दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शुक्रवारी व्यक्त केली.
अजितदादांच्या बेताल वक्तव्याबद्दल मंत्रिमंडळ खेद व्यक्त करते, अशा आशयाचे निवेदन करण्याची तयारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दर्शविली आहे. पण त्याला अजितदादांचा विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त करू नये, याचा प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी पुनरुच्चार केला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात एस. टी. कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात बैठक झाली. या वेळी उभयतांमध्ये अजितदादांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या विधानांवरून मुख्यमंत्री चव्हाण यांनी विधिमंडळात खेद व्यक्त केल्यास राजकीयदृष्टय़ा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते.
शरद पवार यांनी पक्षाच्या मुख्यालयात कन्या सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. अजितदादांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. प्रदेशाध्यक्ष पिचड आणि सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या बाजूने किल्ला लढविला. राज ठाकरे यांची भाषा अत्यंत अश्लाघ्य असते, पण त्यावर कोणी बोलत नाही, असे पिचड यांचे म्हणणे होते.
सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या वक्तव्यावर काही भाष्य केले नाही, पण विरोधकांनी हा विषय नाहक ताणल्याचे मत व्यक्त केले. अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांवर टिप्पणी केल्याने ही बाब राष्ट्रवादीच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यातून पक्षाचे मोटय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचे मानले जात आहे. जनतेची स्मरणशक्ती यावर पक्षाची भिस्त असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली. विरोधकांनी हा विषय ताणून धरू नये म्हणून पडद्याआडून हालचाली सुरू असल्याचेही समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा