ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं आज ( २ मे ) जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पुढील निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी समिती सूचवली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा : अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं केलं समर्थन; रडणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत म्हणाले…!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असा निर्णय शरद पवारांनी जाहीर केल्यावर यशवंतराव चव्हाण सभागृह घोषणांनी दणाणलं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार…’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवार यांना स्टेजवर जाऊन विनवणी केली. आमदार धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे पायही धरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना शरद पवारांना समजवण्याची विनंती केली. तेव्हा अजित पवारांनी मध्यस्थी करत, “सुप्रिया, तू बोलू नको. तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय. गप्प बसा बाकीचे,” अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं आहे.

हेही वाचा : “गेली ६० वर्षे…”, शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यावर जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर; म्हणाले…

“रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत…”

“गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. पण, यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो,” असं शरद पवारांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar announcement retirement ajit pawar stop speak supriya sule in yb center ssa
Show comments