राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री असताना आणि केंद्रीय राजकारणात प्रस्थापित होत असतानाही महाराष्ट्रात का आले या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार होते आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात पाठवण्यात आलं का या प्रश्नाचंही थेट उत्तर दिलं. यात त्यांनी अजिबात इच्छा नसतानाही मला दिल्लीतून महाराष्ट्रात यावं लागल्याचं मत व्यक्त केलं आणि या निर्णयामागील कारणं सांगितली. ते त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी केली. मी स्वतः सीताराम केसरी यांच्यासमोर उभं राहिलो, पण उत्तर भारतातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सीताराम केसरी यांना पाठिंबा दिला. दक्षिण भारतातील सहकाऱ्यांनी मला पाठिंबा दिला. साहजिकच उत्तर भारतीय सहकाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मला यश आलं नाही ही वस्तूस्थिती आहे. महाराष्ट्रात येण्याचा निर्णय अजिबात माझा नव्हता.”
“…तेव्हा मी नरसिंहराव यांना कळवून परत दिल्लीला गेलो”
“बाबरी मशिदीचा प्रश्न आला आणि त्यानंतर दंगली झाल्या. जवळपास १४-१५ दिवस मुंबईचं जनजीवन उद्ध्वस्त झालं. तेव्हा मी संरक्षण मंत्री होतो. तेव्हा मला तुम्ही महाराष्ट्रात असला पाहिजे असं सांगण्यात आलं. मी आलो, पण माझ्या लक्षात आलं की अशा संघर्षात निर्णय घेणारी ऑथिरिटी एकच असली पाहिजे. तेव्हा मी आणि सुधाकरराव असे दोघे होतो. त्याचे दुष्परिणाम होतात असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी नरसिंहराव यांना कळवून परत दिल्लीला गेलो,” असं शरद पवार यांनी सांगितलं.
“तुम्ही गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सांगण्यात आलं”
शरद पवार पुढे म्हणाले, “नंतर मला पुन्हा यावं लागलं त्याचं कारण ही दंगल वाढली. तेव्हा वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली की मुंबई जाग्यावर आली नाही तर संपूर्ण जगात संदेश जाईल की हा देश स्थिरतेपासून बाजूला गेला आहे. जगात मुंबईला अधिक महत्त्व दिलं जातं. विशेषतः देशाची अर्थव्यवस्था मुंबईवर अवलंबून आहे. त्यामुळे मुंबई स्थिर झाली पाहिजे यासाठी मला पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावलं गेलं. त्यांनी मला तुम्ही गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सांगितलं.”
“…म्हणून मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला”
“माझी दिल्लीतून महाराष्ट्रात जायची अजिबात इच्छा नव्हती. जवळपास सहा-साडेसहा तास मला अत्यंत आग्रह करण्यात आला. शेवटी मला काही भावनिक गोष्टी सांगितल्या. ज्या राज्यात तुम्ही वाढला, ज्या राज्यातून तुम्ही इथपर्यंत आलात ते राज्य जळतंय. अशावेळी तुम्ही जबाबदारी घेत नसाल तर याचं आम्हाला दुःख होतं असंही म्हटलं गेलं. त्यामुळे साहजिक त्या परिस्थितीत मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला,” असंही त्यांनी नमूद केलं.
“…म्हणून मी ११ बॉम्बस्फोट झालेले असताना १२ स्फोट झाल्याचं खोटं बोललो”
यावेळी शरद पवार यांनी मुंबईत ११ बॉम्बस्फॉट झाले होते आणि ते हिंदूबहुल भागात झालेले असतानाही मी जाणीवपूर्वक १२ स्फोट झाल्याचं खोटं सांगितल्याचीही आठवण सांगितली. मुंबईत धार्मिक दंगल होऊ नये आणि हे स्फोट एका धर्माच्या विरोधात आहेत असं वाटू नये म्हणून मी ते खोटं बोललो. यामुळे दुसऱ्या दिवशी मुंबई रुळावर आली, असंही त्यांनी नमूद केलं.