राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केला. “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा ‘प्लॅन बी’ सुरू आहे,” असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता शरद पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर राजीनामा मागे घेतल्यानंतर त्यांना चव्हाणांच्या या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर पवारांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं.
शरद पवार म्हणाले, “काही लोकांची पक्की मतं असतात. ती पक्की मतं असणाऱ्यांपैकी ज्याचं नाव आपण घेतलं ते गृहस्थ आहेत. त्यांचं पक्कं मत असं असतं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येकवेळी मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला की, त्यांचं मत आमच्याबाबत प्रतिकूल असतं. त्यामुळे आम्ही त्याची कधी गांभीर्याने नोंद घेत नाही आणि लोक किती गांभीर्याने घेतात हे मला माहिती नाही.”
“अनेक आमदार एका मोठ्या नेत्याबरोबर दुसऱ्या पक्षात जाणार होते म्हणून राजीनामा दिला का?”
“अनेक आमदार एका मोठ्या नेत्याबरोबर दुसऱ्या पक्षात जाणार होते म्हणून राजीनामा दिला का?” या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “कोणताही पक्ष असू द्या, जर कुणाला पक्ष सोडून जायचं असेल, तर त्यांना कुणीही अडवत नाही. त्यासाठी पक्षाच्या नेत्याने स्वतः नरमाईची भूमिका घेण्याची गरज नाही. अशावेळी नेत्याने पुढे येऊन या परिस्थितीत बदल कसा घडू शकतो यावर लक्ष दिलं पाहिजे. इतकं तर मला कळतं. मात्र, अशी स्थिती आमच्या पक्षात नाही.”
हेही वाचा : VIDEO: तुमचा उत्तराधिकारी कोण असणार? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार स्पष्टच म्हणाले, “माझ्या मनात जरूर…”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : शरद पवार यांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तर होणार का? अजित पवार स्पष्टच म्हणाले…
“राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये भाजपाबरोबर जाण्याचा कल आहे का?”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये भाजपाबरोबर जाण्याचा कल आहे का? निवृत्तीनंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं असा विचार आहे का? असे दोन प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. एक गोष्ट त्यातील काही अंशी खरी आहे की, मी राजीनामा मागे घेण्याबाबत ऐकणार नाही असं लक्षात घेऊन काही सहकाऱ्यांनी मी अध्यक्ष म्हणून काम करावं आणि एका कार्याध्यक्षाच्या पदाची निर्मिती करण्याचा विचार करा, असं सुचवलं होतं. मात्र, ही सूचना सहकाऱ्यांना आणि सुप्रिया सुळे दोघांनाही मान्य नव्हती.”