राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाकडून पक्षावर दावा केला जात आहे. हा पक्षावरील दाव्याचा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. तसेच आंदोलन केल्याने गुन्हे दाखल होतील याला घाबरू नका. आपलं सरकार आल्यावर हे गुन्हे काढून टाकू, असंही नमूद केलं. ते बुधवारी (११ ऑक्टोबर) मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. आज आपण बघतो की, २६ जानेवारीच्या दिल्लीतील परेडचं नेतृत्व मुली करतात. एका बाजुला ही जमेची बाजूला आहे आणि दुसरीकडे मणिपूरसारखं उदाहरण आहे. तेथे महिलांची धिंड काढली गेली, व्यक्तिगत हल्ले केले गेले. जीवे मारलं जातं आणि हे चित्र भारतातील आहे. या प्रश्नावर अतिशय जागरूक राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे.”
“कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक आले की कार्यकर्त्यांवरील गुन्हे काढून टाकतात”
“अशी घटना घडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातील भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजे. त्यासाठी त्यांनी आग्रह धरला पाहिजे. काही होत नाही. रस्त्यावर उतरलं म्हणून एखादा गुन्हा दाखल करतील, एखादं कलम लावतील. विद्या चव्हाण यांचं रेकॉर्ड तपासलं तर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले लक्षात येईल,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “तुला काही कळतं का, ते आतून एकच आहेत”; शरद पवारांसमोर जयंत पाटील म्हणाले…
“महिलांनी रस्त्यावर उतरावं, तुमच्यावरील गुन्हे आपलं सरकार आल्यावर हटवू”
“हे सर्व गुन्हे लोकांच्या प्रश्नासाठी दाखल होतात. त्यामुळे त्याची काही चिंता करायची नसते. कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक येतात आणि त्यावेळी आम्ही हे गुन्हे काढून टाकतो. त्यामुळे या गुन्ह्यांची काही चिंता करू नका. रास्त प्रश्नांवर रस्त्यावर येणं हा आपला हक्क आहे, ही भूमिका समजून घेतली पाहिजे”, असंही शरद पवारांनी नमूद केलं.