मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) आढावा बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रचाराचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार कौतुक केले. तसेच विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घवघवीत यश मिळण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची कबुलीही पवार यांनी या वेळी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीस बुधवारी प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात पक्षाच्या आघाडीच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या वेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा निवडणुका ‘हातचा मळ’ असल्याचा आम्ही समज केला. दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची गांभीर्याने नोंद घेतली होती. त्यात संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. ते घरोघरी गेले. हिंदुत्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना सांगितल्या. मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्याचा परिणाम त्यांना निकालाच्या रुपात मिळाला, असे पवार म्हणाले. निवडणुकांचे यश १०० टक्के नसते. १९५२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ९० टक्के जागा जिंकल्या होत्या. १९५७ च्या निवडणुकांवेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्याचा असा परिणाम झाला की, काँग्रेसच्या अनेक जिल्ह्यात शून्य तर काही जिल्ह्यात एक-दोन जागा निवडून आल्या. यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व असताना असे घडले हाेते.

‘नव्यांना सधी, विद्यमानांनी पदत्याग करावा’

आपल्याकडे पूर्ण पाच वर्षे आहेत. आजपासून कामाला लागा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. या निवडणुकीत मोठी जोखीम घेणार आहे. महिलांमध्ये ५० टक्के आणि खुल्या गटात ६० टक्के उमेदवारी तरुणांना दिली जाईल. प्रस्थापित घराण्यातील युवकांना प्राधान्य नसेल. पक्ष सामान्यांचा करायचा असेल तर याला पर्याय नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न

पक्ष संघटनेत ७० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. पस्तिशीच्या पुढच्या कार्यकर्त्यांनी आता राज्यपातळीवर काम करावे. दोन दिवसांच्या या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय होईल. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पदत्याग करण्याबाबत स्वत:हून पुढे यावे. त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी आहे, असे पवार यांनी बजावले.

विद्यापीठ नामांतरावेळी मराठवड्यात जशी तणावाची स्थिती होती, अशी आज बनली आहे. जातीजातीला तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे. निवडणुकांपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

हेही वाचा – मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी शिवाजीनगरची हवा ‘वाईट’, परिसरावार मॉनिटरिंग व्हॅनची नजर

जाणाऱ्यांनी जावे : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत ५६ वरून १० वर आला आहे. यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे. बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेकजण तिकडे हारगुच्छ देऊन आले आहेत. कोणाला तिकडे जायचे असेल त्यांनी जरूर जावे, अशा शब्दांत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar appreciate rss work in maharashtra assembly election mumbai print news ssb