अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या गटात दावे प्रतिदावे होत आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर अजित पवार गटाने जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याचं जाहीर केलं. याशिवाय जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी दिल्ली राष्ट्रवादीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत पत्र जारी करत त्यांनी दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी आपल्या विश्वासू नेत्यावर सोपवली आहे.
शरद पवार यांनी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी सोनिया दूहान यांच्या खांद्यावर दिली आहे. या त्याच सोनिया दूहान आहेत ज्यांनी मागच्या वेळी राष्ट्रवादीत झालेल्या बंडाच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच आताही राष्ट्रवादीतील बंडानंतर त्या ठामपणे शरद पवारांबरोबर उभ्या राहिल्या.
शरद पवारांनी सोनिया दूहान यांच्या नियुक्तीचं पत्र ट्वीट करत याची माहिती दिली. या पत्रात शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हे सुचित करण्यात येत आहे की, सोनिया दूहान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी दिल्ली कार्यालयाच्या प्रमुख असतील.”
हेही वाचा : “अनेकांना माहिती होतं की, शरद पवारांचे…”, राष्ट्रवादीतील बंडाबाबत काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
दिल्ली कार्यालयातून प्रफुल पटेल यांचे फोटोही हटवले
दरम्यान, सकाळीच सोनिया दूहान यांनी दिल्ली कार्यालयातून प्रफुल पटेल यांचे फोटोही हटवत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.