रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळाली असली, तरी त्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेही त्यासाठी आशीर्वाद लाभल्याची चर्चा आहे. सासवड व पुण्यातील पवार – आठवले यांच्या भेटीनंतरच आठवले यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जाते.
शिवसेनेने हात झटकल्यानंतर आठवले यांना भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळेल, अशी आशा होती.  मात्र भाजपचा आठवले यांना बिहार किंवा मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवावे, असा विचार पहिल्यांदा झाला. परंतु त्या दोन्ही राज्यांतील भाजप नेतृत्वाने फारशी अनुकूलता दाखविली नाही, त्यामुळे आठवले अस्वस्थ होते. त्या अस्वस्थतेतच त्यांचे राजकीय गुरु शरद पवार यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सासवडला भेट झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बऱ्याच कालावधीनंतर आठवले-पवार एकत्र आले होते. त्यावेळी पवार यांनी आठवले यांच्या राजकीय ख्यालीखुशालीबद्दल विचारपूस केल्याचे सांगण्यात येते.
साहित्य संमेलनानंतर १७ जानेवारीला पुणे महापालिकेच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाच्या उद्घाटनालाही शरद पवार यांच्याबरोबरच आठवले यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून खास निमंत्रण दिले होते. पुण्यात रिपाइचे दोन नगरसेवक आहेत आणि शिवसेना-भाजपबरोबर त्यांची आघाडी आहे. तरीही पवारांसोबत आठवले यांना या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यावेळी पवार यांनी आठवले यांना काँग्रेसआघाडीसोबत येण्याचे आणि आठवले यांनी पवारांना एनडीएत येण्याचे जाहीर आवतणे दिले होते. इतकेच नव्हे तर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे तोंडभरुन कौतुकही केले. पुढे आठवले यांच्या खासदारकीसाठी भाजपमध्येही वेगाने हालचाली झाल्या. भाजपकडून आठवले यांची उमेदवारी जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपच्या प्रयत्नालाही पवारांच्या आशिर्वादाने यश मिळाल्याचे समजते. एकंदरीत महाराष्ट्रात आठवले यांना कॅबिनेट मंत्री व तीनदा लोकसभेचे खासदारकी मिळवून देणाऱ्या पवारांचे भाजपपुरस्कृत राज्यसभेच्या खासदारकीसाठीही हस्ते-परहस्ते आशिर्वाद लाभल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

Story img Loader