सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निर्देश दिले आहेत. यानंतर राहुल नार्वेकरांनी “मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन”, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी (१० जून) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार आहेत हे मला माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी होतील हे सांगता येणार नाही. विधानसभा क्षेत्रात मी जास्त लक्ष घालत नाही.”
“क्रांतीकारक निर्णय घेतला की बोलू”
“राहुल नार्वेकरांनी क्रांतीकारी निर्णय घेऊ असं वक्तव्य केल्याचं मी वाचलं. त्यामुळे ते काय क्रांतीकारी निर्णय घेतात याची आम्ही वाट पाहतो आहे. त्यांनी क्रांतीकारी निर्णय घेतला की, आम्ही त्यावर बोलू,” असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले होते?
दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ात बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले होते, “बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यातून कर्तृत्व घडविले. त्यांनी समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान दिले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले.”
हेही वाचा : Video: नव्या निर्णयानंतर अजित पवारांवर अन्याय झाला का? जयंत पाटील स्पष्टच म्हणाले, “शरद पवारांनी…”
“मीही लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन”
“त्यापैकी एक म्हणजे ईबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा होय. त्यांनी ज्या ज्या खात्यात काम केले, त्या त्या खात्यात क्रांतिकारी निर्णय करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा उमटवला. ज्या प्रमाणे त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतिकारी निर्णय घेतले, त्यातून बरेचसे शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन,” असं राहुल नार्वेकर म्हणाले होते.