मुंबई : देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. पण यापैकी कोणालाही आपल्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी हल्ला चढवला.
शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘दगाबाज’ असा केला होता. त्याला पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ‘सरदार पटेलांनी गृहमंत्री म्हणून काम करताना अनेक राज्यांना एकत्र करण्याचे काम केले. देश एकसंध केला. केंद्रीय गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांनी मोठे योगदान दिले आहे. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून केलेले काम त्या पदाची प्रतिष्ठा वाढविणारे होते. गुजरात आणि महाराष्ट्र एक राज्य होते. गुजरातने अत्यंत उत्तम प्रशासनाची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई हे गुजरातचे कर्तबगार, प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवसिंह सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी नेते उत्तम प्रशासक होते. पण यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नव्हते,’ असा टोला पवारांनी लगावला.
हेही वाचा >>> मांजामुळे दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक जखमी, छत्रपती शिवाजी पुलावरील घटना
पवारांनी १९७८ पासून चालवलेल्या विश्वासघात आणि दगाबाजीच्या राजकारणाचा भाजपच्या विधानसभेतील विजयाने शेवट केला, असे विधान अमित शहा यांनी केले होते. त्याला उत्तर देताना ‘पुलोद सरकारचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना जनसंघाचे अनेक नेते माझ्या मंत्रिमंडळात काम करीत होते,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली. वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी संघात राहून आम्हाला सहकार्य केले. पण राजकीय पक्षांतील नेत्यांमध्ये सुसंवाद होता. वाजपेयी आणि अडवाणी हे कर्तृत्ववान नेते होते, त्यांनी अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केले नाही. भूजला भूकंप झाला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. अतिवृष्टी आणि महापूर, भूकंप आदी आपत्तींच्या वेळीचे धोरण ठरविण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असतानाही मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केले. अशी आठवण पवारांनी सांगितली.
स्वबळाबाबत लवकरच बैठक
इंडिया आघाडी किंवा राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचे ठरले नव्हते. पुढील आठ-दहा दिवसांत मुंबईत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक घेऊन राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वबळावर याचा निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
एसआयटी बदलण्यास विलंब का?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात (एसआयटी) बदल करण्यासाठी ३६ दिवस का लागले. पथकांतील काही पोलीस अधिकारी वाल्मीक कराड याचे मित्र आहेत, हे कळण्यासाठी गृह खात्याला इतके दिवस का लागले, कराडला खंडणीच्या आरोपाखाली मकोका लावला आहे. हत्येच्या आरोपाखाली मकोका लावला पाहिजे. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर नाष्मुकीची वेळ आली आहे. कारण नसताना देशमुख हत्या प्रकरणाला जातीचे वळण दिले जात आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
बाळासाहेबांकडे मदतीची याचना
सध्याचे गृहमंत्री (अमित शहा) जेव्हा गुजरातमधून तडीपार झाले तेव्हा त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी जाऊन सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे अधिक सांगतील, असेही पवार म्हणाले.