पुढील निवडणुकीनंतर महाराष्ट्रात किती जण मुख्यमंत्री होणार हेच मला समजत नाही, असा खोचक सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या साऱ्यांनाच चांगलाच टोला हाणला. त्यांचा हा रोख अर्थातच पुतणे अजित पवार यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून होता हे स्पष्टच होते. आघाडीत राष्ट्रवादी १४५ जागांवर दावा करणार, असे विधान करणाऱ्या अजितदादांच्या निकटवर्तीयाची पवार यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
येणारा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमरावीतमध्ये केले होते. राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार राज ठाकरे यांनीही शनिवारी मनसेच्या वर्धापनदिन सोहळ्यात केला होता. अजित पवार यांनीही मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखविली आहे. या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांनी केलेली मल्लीनथी महत्त्वाची ठरते. अर्थात अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणताना त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता हेही सांगण्याचा प्रयत्न केला. आघाडीत सर्वाधिक जागा आल्यास मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावे, असे मत त्यांनी मांडले आहे. सध्या आमचे सारे लक्ष हे दुष्काळ निवारणावर आहे. आमच्याकडे या विषयावर चर्चाही नाही. आम्ही आणणारच वगैरे या भानगडीत पडत नाही. मात्र अजितदादांनी २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद नाकारण्यात चूक झाली, असे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले की, तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळाले नसले तरी सत्तेत राष्ट्रवादीला जास्त वाटा मिळाला होता.
राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर आघाडी कायम राहिल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
आघाडीत राष्ट्रवादीला १४५ जागा मिळाव्यात अशी मागणी पक्षाचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले की, या मागणीबाबत माझ्यासह पक्षाच्या कोणत्याही नेत्याला काहीही माहिती नाही. पक्षाची तशी कोणतीही भूमिका नाही. अशी भूमिका मांडलेल्या वाणी यांना शनिवारीच बोलावून योग्य तो संदेश दिल्याचे पवार यांनी सांगितले. पूर्वाश्रमीचे भाजपचे पदाधिकारी असलेले पुण्यातील वसंत वाणी यांचे राष्ट्रवादीत अलीकडे फारच प्रस्थ वाढले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने वाणी यांची गाडी सुसाट निघाली होती. पक्षाच्या मंत्र्यांना हे वाणी महाशय फर्मान सोडू लागले होते. अजितदादांच्या जवळचे असल्याने कोणी त्यांच्याशी पंगा घेत नव्हते. पण शरद पवार यांनी अजितदादांच्या या निकटवर्तीयाची चांगलीच कानउघाडणी करून पक्षात अजितदादांच्या निकटवर्तीयांना महत्त्व नाही हाच संदेश दिला.

Story img Loader