देशाची राजधानी दिल्लीत होत असलेल्या जी२० परिषदेचं अध्यक्षपद भुषवताना मोदी सरकारने जगभरातील दिग्गज राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. यात जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या विविध देशांच्या अध्यक्षांना चांदी आणि सोन्याच्या भांड्यात जेवण वाढलं गेलं. या ताटांचे फोटो चर्चेचा विषय ठरले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जी२० परिषदेतील सोन्या-चांदीच्या ताटांवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना फटकारलं. ते रविवारी (१० सप्टेंबर) मुंबईत कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जी२० परिषदेवर बोलताना शरद पवार म्हणाले, “देशात २० देशांची मोठी परिषद सुरू आहे. अशा परिषदा देशात याआधी दोनदा झाल्या. एकदा पंतप्रधान इंदिरा गांधी असताना झाली आणि आणखी एकदा झाली होती. आता देशात तिसऱ्यांदा जी२० परिषद होत आहे. पहिल्या दोन परिषदांनाही जगातील लोक आले, मात्र त्यावेळी आजच्यासारखं वातावरण तयार करण्यात आलं नव्हतं.”

“आधीच्या परिषदांना सोन्या-चांदीची ताटं नव्हती”

“माझ्या कधी असं वाचनात आलं नाही की, त्या आधीच्या दोन परिषदांना चांदीची ताटं, सोन्याची ताटं आणखी काय काय होतं. जगातील विविध देशांचे प्रमुख या ठिकाणी येतात त्यांचा सन्मान करणं आपलं काम आहे हे मला मान्य आहे. या देशाच्या दृष्टीने ती महत्त्वाची बाब आहे. मात्र, या निमित्ताने मुलभूत प्रश्नांऐवजी काही ठराविक लोकांच्या मोठेपणाचा प्रचार करण्यासाठी या परिषदेचा वापर होतोय. हे कितपत योग्य आहे याची चर्चा आज ना उद्या होईल. तसेच लोक त्याविषयी आपली मतं बनवतील,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : भारत की इंडिया वादावर शरद पवारांचा हसत हसत पंतप्रधान मोदींना प्रश्न, म्हणाले

“सध्या देशात महत्त्वाच्या प्रश्नांना बाजूला ठेवलं जातंय”

“म्हणून एकच गोष्ट दिसते की, सध्या देशाच्या पातळीवर महत्त्वाच्या प्रश्नांना बाजूला ठेवलं जात आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकीसाठी हवं तसं वातावरण करण्यासाठी पाऊल टाकण्याचं त्यांचं धोरण आहे. सामान्य लोकांचं हित, महागाईचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न यापैकी कुठल्याही प्रश्नाकडे आजचे राज्यकर्ते बघत नाही हे लोकांना पटवून द्यावं लागेल. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. ते आपण करू. लोक तुमच्याबरोबर आहेत,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar criticize modi government over gold silver plates in g20 summit pbs