नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू होती. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मेघालय निवडणुकीतील प्रचाराचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. ते बुधवारी (८ मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “नागालँडमध्ये एकंदर चित्र बघितल्यानंतर तिथं एकप्रकारे स्थैर्य येण्यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांना आमची मदत होत असेल, तर ती करा, असा आमचा निर्णय आहे. त्यात भाजपा नाही.”
“मेघालयच्या प्रचारात मोदींनी ज्या मुख्यमंत्र्याला भ्रष्टाचारी म्हटलं त्याच्याच शपथविधीला हजेरी लावली”
“भाजपाविषयी बोलायचं झालं, तर मेघालय आणि शेजारच्या राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह दोघेही गेले होते. मोदींनी मेघालयच्या प्रचारात तेथील मुख्यमंत्री आणि तेथील राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांचा पराभव करा असं सांगितलं,” असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : मोठी बातमी! नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा
“मात्र, निकालानंतर मोदी त्याच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिले आणि त्यांच्या मंत्रिमंडळातही भाजपा सहभागी झाला. ही भूमिका आम्ही घेतलेली नाही,” असं म्हणत शरद पवारांनी मोदी आणि भाजपाला टोला लगावला.
“राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्याची आमचं चालू आहे. दोन दिवसांत संसदेचं अधिवेशन सुरु होईल. तेव्हा मित्र पक्षाशी चर्चा करणार आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.